- निनाद देशमुखपुणे : जगभरातील विविध देशांचे उपग्रह व्यावसायिकरीत्या प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने ‘न्यू स्पेस इंडिया’ या स्वतंत्र कंपनीची स्थापना केली आहे. हे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी इस्रोने आता नवा लघु प्रक्षेपक (एसएसएलव्ही) बनविण्यास सुरुवात केली असून त्याच्या निर्मितीत पुण्यातील वालचंदनगर कंपनीने मोठा वाटा उचलला आहे. प्रक्षपकाचे संपूर्ण कवच कंपनीत तयार करण्यार येणार असून त्याचा पहिला भाग इस्रोच्या शास्त्रज्ञांना सुपूर्त करण्यात आला आहे. जीएसलव्ही मार्क ३ प्रक्षेपकाच्या यशानंतर इस्रोने व्यावसायिक स्तरावर जगभरातील देशांच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून पृथ्वीच्या कक्षेत त्यांचे उपग्रह स्थापित करून नफा मिळविण्याचा इस्रोचा मानस आहे. या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी इस्रोतर्फे लघु प्रक्षेपक म्हणजेचे ‘स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेईकल’ बनविण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्षेपकाचे बाह्य कवच पुण्यातील वालचंदनगर कंपनीला दिले आहे. हा प्रक्षेपक तीन टप्प्यात उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करणार आहे. या तिन्ही टप्प्यांचे काम वालचंदनगर कंपनीत सुरू आहे. प्रक्षेपकाचा नॉझलचा एसएस १ नामक पहिला भाग तयार झाला आहे. इस्रोच्या या प्रकल्पाचे प्रोजेक्ट डायरेक्टर एस. एस. विनोद यांना तो शुक्रवारी सुपूर्त करण्यात आला.या प्रक्षेपकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील भागाचे काम सध्या कंपनीत सुरू असून येत्या काही महिन्यांत ते पूर्ण करण्यात येईल. हे भागही लवकरच इस्रोला हस्तांतरित करण्यात येणार आहेत. यानंतर काही दिवसांत या प्रकल्पाच्या पहिल्या उड्डाणाची तारीख ठरविण्यात येणार आहे.
* पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकलला ठरणार पर्यायजीएसएलव्ही मार्क ३ द्वारे आपण शंभरपेक्षा जास्त उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित केले होते. पृथ्वीच्या लो अर्थ ऑरबिट कक्षेत उपग्रह सोडण्यासाठी पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकलचा वापर केला जात होता. जवळपास १,७०० किलो वजन वाहून नेण्याची या प्रक्षेपकाची क्षमता आहे. मात्र, त्यापेक्षा कमी वजनाचे उपग्रह आता पृथ्वीच्या या कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी एसएसएलव्हीचा वापर होणार आहे.
* जागतिक अवकाश बाजारपेठ इस्रो घेणार ताब्यातभारतीय उपग्रह प्रक्षेपक भरवशाचे आणि कमी खर्चाचे आहे. यामुळे अमेरिकाही भारताच्या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात उपग्रह सोडण्यास प्राधान्य देत आहे. जगात अमेरिका, चीन, इस्राईल, जपान, रशिया या देशांकडे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. मात्र, ते खूप महागडे आहे. त्यातुलनेत भारतीय प्रक्षेपक कमी खर्चिक असल्यामुळे अनेक देश त्यांचे उपग्रह भारताकडून सोडण्यास तयार आहेत. जगात वाढणारी ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी भारताने ‘न्यू स्पेस इंडिया’ ही कंपनी स्थापन केली असून या नव्या प्रक्षेपकाद्वारे आपण जागतिक अवकाश बाजारपेठ काबीज करण्यासाठी सज्ज झालो आहोत.
............आपण इतर देशांचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी पीएसलव्ही या प्रक्षेपकाचा वापर करीत होतो. याद्वारे जवळपास २०० पेक्षा जास्त उपग्रह आपण प्रक्षेपित केले आहे. यामुळे छोटे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी मोठी बाजारपेठ असल्याचे आपल्याला लक्षात आले. तसेच, भारतीय प्रक्षेपक भरवशाचे आणि कमी खर्चिक आहे. यामुळे ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी इस्रोच्या अध्यक्षांतर्फे लघु प्रक्षेपक बनविण्याची कल्पना मांडण्यात आली. हे प्रक्षेपक तयार करण्यासाठी कमी वेळ लागेल आणि प्रक्षेपकाच्या तयारीचा कालावधी कमी दिवसांवर आणावा, हा हेतू ठेवून त्याची निर्मिती करून जास्तीत जास्त उपग्रह प्रक्षेपित करून परदेशी चलन कमावण्याची मनीषा होती. हे काम जोरात सुरू आहे. या यानाच्या उड्डाणाआधीच बुकिंग सुरू झाले आहे. या यानामुळे आपण अवकाश क्षेत्रात अग्रगण्य ठरू. -सुरेश नाईक, माजी अध्यक्ष इस्रो
.....छोटे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी इस्रोतर्फे एसएसएलव्ही प्रक्षेपकाची निर्मिती करण्यात येत आहे. या प्रक्षेपकाचे काम वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये होत असून प्रक्षेपकाच्या फर्स्ट फ्लाईट सेगमेंटचे काम पूर्ण झाले आहे. ते इस्रोला हस्तांतरित करण्यात आले आहे. इस्रोच्या प्रत्येक मोहिमेत त्यांच्या मागणीनुसार आम्ही काम करत असून आम्हाला याचा मोठा आनंद आहे.- जी. के. पिल्लाई, संचालक आणि मुख्य व्यवस्थापक, वालचंदनगर इंडस्ट्रीज