हंसराज अहीर : अपायकारक औषधांच्या उत्पादनावर निर्बंध नागपूर : चीनमध्ये कोळशापासून युरियाची निर्मिती केली जाते. या धर्तीवर प्रकल्प उभारून युरिया खताची निर्मिती करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी दिली. टिळक पत्रकार भवनतर्फे आयोजित ‘मीट द प्रेस’मध्ये ते बोलत होते.खत व औषधीची मागणी आपण पूर्ण करू शकत नसल्याने विदेशातून आयात करावी लागते. रासायिनक खतावर वर्षाला १ लाख २० हजार कोटींचे अनुदान दिले जाते. यात बचत करण्यासाठी देशाला खतनिर्मितीत आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न आहे. गेल व कोल इंडियाच्या माध्यमातून ओरिसा येथे कोळशापासून युरिया निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. औषधीच्या क्षेत्रात वर्षाला १ लाख ८० हजार कोटींची उलाढाल होते. देशात १० हजार ५०० लहान-मोठ्या औषध कंपन्या आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. खते व औषधनिर्मितीत देशाला आत्मनिर्भर करून अनुदानात बचत करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. गरिबांना कमी किमतीत जीवन रक्षक औषधी उपलब्ध व्हावीत, यासाठी या औषधींच्या यादीत वाढ करण्याचा विचार आहे. खते व औषधनिर्मितीत देशाला आत्मनिर्भर करून रसायने व खते विभाग मेक इन इंडियात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील लोकांना औषधी उपलब्ध व्हावीत, यासाठी तालुकास्तरावर औषधी भांडार सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. अपायकारक औषधांच्या उत्पादनावर केंद्र सरकारने निर्बंध घातल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, प्रमोद पेंडके यांच्यासह टिळक पत्रकार भवनचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोळशापासून युरिया निर्मिती करणार
By admin | Published: January 04, 2015 12:59 AM