मनोज ताजने
गडचिरोली : निसर्गाने भरभरून वनवैभव देऊनही नियमांच्या बंधनामुळे वर्षानुवर्षे जंगलालगत राहणाऱ्या आदिवासींच्या जीवनमानात कोणताही बदल झाला नाही. ‘उशाशी राहूनही उपाशीच’ अशी त्यांची अवस्था आहे. मात्र, आता महत्त्वाचा वनोपज असलेल्या मोहफुलांवरील काही बंधने राज्य शासनाने शिथिल केली आहेत. त्यामुळे आदिवासींच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरावे. राज्याचे तत्कालीन वन सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २०१७ मध्ये केलेल्या शिफारशीच्या आधारे मोहफुलांना बंधनमुक्त करण्यासाठी ४ मे २०२१ ही तारीख उजाडली.
मोहफुलांची खरेदी, गोळा करणे आणि वाहतूक यावरील निर्बंध मागे घेतले आहेत. तसेच मोहफुलांची साठवणूक, विक्री व व्यापार करण्याकरिता एमएफ-२ परवान्यात वार्षिक कोट्याची मर्यादा ५०० क्विंटलपर्यंत मर्यादित झाली आहे. शिवाय हा परवाना आता केवळ आदिवासी सदस्य असलेल्या आदिवासी विकास संस्था, महिला बचत गट, सहकारी संस्था किंवा ग्रामपंचायत अशा मान्यताप्राप्त संस्थांनाच मंजूर केला जाणार आहे.
या निर्णयामुळे आदिवासींच्या आर्थिक विकासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. पण त्यासाठी आदिवासी बचत गटांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि मोहापासून तयार होणाऱ्या आरोग्यवर्धक पदार्थांचे ब्रँडिंग होणे गरजेचे आहे. मोहफुलात व्हॅल्यू ॲडिशन करून विविध पदार्थ निर्मिती केल्यास कोट्यवधींचे उत्पन्न मिळू शकते. - सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री.
हे पौष्टिक पदार्थ होतात तयारमोहफुलांपासून जॅम, सरबत, लाडू, चटणी, वनस्पती तूप, साबण, बायोडिझेल असे अनेक पदार्थ तयार होतात. गडचिरोलीत वन विभागाच्या पुढाकाराने गोंडवाना हर्ब्स प्रक्रिया केंद्रामार्फत काही पदार्थ तयार होतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबादच्या संशोधनानुसार, मोहफुलांमध्ये सफरचंद, केळी, आंबा, मनुका यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात प्रथिने, तंतुमय पदार्थ, कॅल्शियम, कर्बोदके आणि इतर पौष्टिक घटक असतात.
वर्षाकाठी ४०० कोटींची मोहफुलेविदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यांसह धुळे आणि ठाणे जिल्ह्यात मोहफुलांचे उत्पादन होते. सध्या गोळा होतात, त्यापेक्षा जास्त मोहफूल आतील जंगलातून गोळा केले जाऊ शकतात. खारगे समितीच्या अहवालानुसार राज्यात सव्वालाख मेट्रिक टन मोहफुलांची उत्पादन क्षमता आहे. त्याची किंमत ४०० कोटींच्या घरात जाते.
उद्योगाला संधीचंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी, गोंडपिपरी, बल्लारपूर, मूल आणि सावली या तालुक्यातील जंगलामध्ये भरपूर मोहाची झाडे आहेत. मोहफुलांमध्ये औषधी गुणधर्म आहेत.
रोजगाराच्या संधी गोंदिया जिल्ह्यात मार्च ते मे या कालावधीत ग्रामीण भागातील नागरिक तेंदुपत्यासह मोहफुलांचे संकलन करतात. यामुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो.
२० कोटींची उलाढालप्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास भंडारा जिल्ह्यात २० कोटींची उलाढाल होऊ शकते. औषधीयुक्त असल्यामुळे मोहफूल वृक्षलागवड चळवळ राबविण्याची गरज आहे.