मुंबई - शिवसेना उबाठा पक्षाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा.शिल्पा बोडखे यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोडखे यांचं पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विदर्भात शिवसेना वाढवण्याचे सर्वसामान्य पोहचवण्याचे काम आजवर त्यांनी आपल्या पूर्ण क्षमतेने व प्रामाणिकपणे केले होते. यापुढे त्याच प्रामाणिकपणे पक्षाचे काम त्यांनी करावे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. याचवेळी शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरे गटावर आरोप केले.
शिल्पा बोडखे म्हणाल्या की, राजकारण असो वा कोणतेही सामाजिक क्षेत्र महिलेला आपला आत्मसन्मान व स्वाभिमान महत्वाचा असतो व तो आपण जपला पाहिजे. ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काम करत असतो व तिथे जर वारंवार आपला अपमान केला जात असेल त्या बद्दल ज्यांच्यावर विश्वास ठेऊन आपण काम करतो ते नेतृत्व आपल्याला न्याय मिळवून देण्यास हतबल होत असेल तिथे काम कस करायचे..?? वारंवार अपमान सहन करत आपला आत्मसन्मान व स्वाभिमान आपल्याच पायदळी तुडवायचा का..??. उबाठामध्ये नेतृत्वाच्या आत्मसन्मानाला किंमत पण पदाधिका-यांचे आत्मसन्मान व स्वाभिमानाला काहीच महत्व नाही का...?? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच उबाठा गटामध्ये महिला नेतृत्व उभे राहत असेल तर त्यांच्यावर आरोप लावणे, त्यांचे खच्चीकरण करणे. हा त्रास अडीच महिन्यांपासून दिला जात होता. विदर्भात वसुली गँग बसली आहे. जी महिला त्यांना पैसे कमावून देते तिला पक्षात उभं करायचं. जी प्रामाणिकपणे काम करते तिला त्रास द्यायचा. मला असाच त्रास दिला. पक्षप्रमुखांना मी सगळं सांगितलं पण त्यांनी मला न्याय दिला नाही. बाळासाहेबांची शिवसेना तिथे राहिली नाही. कुणीही आमची दखल घ्यायला आणि विचारायलाही तयार नव्हते असंही शिल्पा बोडखे यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून वाटलं की ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत. महाराष्ट्रभर विकासकाम करत आहेत. म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला. वर्षानुवर्षे उबाठा भवनमध्ये कान भरण्याची परंपरा आहे. एकदा पक्षप्रमुखांचे कान भरले की ते बोलावतही नाहीत आणि भेटतही नाहीत असं शिल्पा बोडखे यांनी म्हटलं.