- राजेश भिसे / गंगाराम आढाव / गजानन वानखेडे, जालनाबारावीची उत्तरपत्रिका ३५ हजार रुपयांत सोडवून देणारे रॅकेट पाच वर्षांपासून सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. शनिवारी पहाटे या प्रकरणात अंबड तालुक्यातील शेवगा येथून एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. याशिवाय घनसावंगी तालुक्यातील रांजणीच्या प्राध्यापकावरही संशय असून त्याच्यावर पाळत ठेवली जात आहे.या रॅकेटमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत असून बोर्डातील अधिकाऱ्यांपासून संबंधित परीक्षा केंद्रप्रमुखापर्यंत सर्वांचीच चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जालना पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा कन्नड (जि. औरंगाबाद) तालुक्यातील पिशोर येथील योगीराज महाविद्यालयाचा प्राचार्य ज्ञानेश्वर सोनवणे आणि जालन्यातील संस्कार निवासी वसतिगृहाचा व्यवस्थापक श्रीमंत वाघविरुद्ध गुन्हा नोंदवून वाघला अटक केली. सोनवणे मात्र पसार झाले. तसेच संस्कार वसतिगृहावर पोलिसांनी छापा टाकून अडीचहजार लिहिलेल्या आणि पाच हजार कोऱ्या उत्तरपत्रिकांसह होलोक्राफ्ट जप्त केले होते. श्रीमंत वाघ व अशोक पालवे या दोघांना शनिवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.शनिवारी अटक केलेला अशोक पालवे हा रोहिलागड येथील जांबुवंत महाविद्यालयात प्राध्यापक असून पाच वर्षांपासून पालवे हा विद्यार्थ्यांना बारावी पास करण्याची हमी देऊन आपल्या महाविद्यालयात प्रवेशदेत होता. यासाठी तो ठरावीकरक्कम घेत असल्याची माहिती हाती आली आहे.पास होण्याची हमी संस्कार निवासी वसतिगृहात बारावी पासची हमी देऊन प्रवेश दिला जात असे. वसतिगृहावर शुक्रवारी रात्री छापा टाकल्यानंतर यासंदर्भातील सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. अजूनही विद्यार्थी तेथे आहेत, असे साहाय्यक पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम म्हणाले.या वसतिगृहात काही वर्षांपूर्वी गुरूकुलच्या धर्तीवर शिक्षण देण्यात येत असे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांकडून ठरावीक शुल्क घेऊन त्यांच्या राहण्याची, जेवणाची, अभ्यासाची सोय करतानाच या विद्यार्थ्यांना शंभर टक्के पासची हमी देण्यात येत असे.१२ प्राचार्यांवर संशयउत्तरपत्रिका लिहून देणाऱ्या रॅकेटमध्ये जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास १२ प्राचार्य असल्याचा संशय आहे. या प्रकरणासंदर्भात माहिती घेण्यासाठी परीक्षा मंडळ बोर्डाचे अध्यक्ष सुखदेव ढेरे शनिवारी सकाळी जालन्यात दाखल झाले. तालुका पोलिसांकडून त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. तसेच जप्त करण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांचीही पाहणी केली. या प्रकरणात जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील १० ते १२ महाविद्यालयांचे प्राचार्य असल्याचा संशय ढेरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. बोर्डाचे यूआयडी कोड नंबर बघून सापडलेले कोड हे कोणत्या शाळेकडे गेले होते, त्याचा शोध घेतला जाईल. त्यानंतरच उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात येईल. याचा बारावीच्या निकालावर कुठलाही परिणाम होणार नाही. नियोजित वेळेवरच बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, असे ढेरे यांनी सांगितले.
प्राध्यापक गजाआड
By admin | Published: March 20, 2016 3:08 AM