पुणे : प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६२ करण्यात आले होते, मात्र अनेक संस्था, संघटना तसेच काहींची वैयक्तिक निवेदने या सर्वांचा विचार करून प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६० वर्षेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. प्राचार्यांसाठी मात्र निवृत्तीची वयोमर्यादा ६५ अशीच कायम ठेवली असल्याचे ते म्हणाले. रात्रशाळा बंदीचा सरकारचा काहीच विचार नसल्याची माहितीही त्यांनी दिली.शिक्षणाशी संबधित विविध विषयांवर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘खोटी कागदपत्रे दाखवून पत्र्याच्या शेडमध्ये महाविद्यालये सुरू करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. अभियांत्रिकीसारख्या अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहतात, विद्यार्थी मिळत नाहीत तरीही नवी महाविद्यालये सुरू करण्यासाठी अर्ज येत असतात. असे सुमारे ७५० अर्ज आले आहेत. त्यांच्यात काही त्रुटी आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांना ३० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. किती नव्या संस्थांना परवानगी द्यायची याचा निर्णय घ्यावा लागेल.’’दहावीचा निकाल १०० टक्के लागावा यासाठी नववीत मुलांना नापास करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. याबाबत विचारले असता तावडे यांनी आठवीपर्यंत परीक्षाच नको या निर्णयाचा वेगळा अर्थ काढला गेल्यामुळे असे होत असल्याचे सांगितले. तो ज्या विषयात कमी पडतो त्याचा विशेष अभ्यास घ्या, असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या शाळांची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.शिक्षक, प्राध्यापक भरतीत खासगी संस्थांकडून मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून पात्र शिक्षक, प्राध्यापक यांची यादीच सरकार तयार करेल. ती नेटवर टाकण्यात येईल. संस्थेला भरती करायची असेल तर त्यांनी या यादीतून निवड करून नंतर मुलाखत वगैरे नेहमीची पद्धत अवलंबून भरती करावी. सरकारी अनुदान घेत असलेल्या संस्थेला हे बंधनकारक असेल अशी माहिती तावडे यांनी दिली. आरटीई शुल्क परताव्यासाठी सरकारने ३२ कोटी रूपयांची तरतुद केली आहे. दप्तरांच्या ओझ्याचा विषय आता सीबीएसई आयसीएसी या शाळांपुरता मर्यादित आहे, असेही तावडे म्हणाले. (प्रतिनिधी)शून्य टक्के निकाल लागलेल्या ६१ शाळा आहेत. त्यांच्या शिक्षकांची २४ जुलैला पुण्यात बैठक आयोजित केली आहे. चौकशी करून शिक्षकांना प्रशिक्षण वगैरे या प्रकारची उपाययोजना राबविण्याचा विचार असल्याची माहिती तावडे यांनी दिली.
प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६०, प्राचार्यांना ६५!
By admin | Published: June 19, 2016 2:16 AM