गजानन हगवणे,
काटेवाडी- काटेवाडी परिसर खरे तर ऊस बागायतदारांचा हरितपट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, येथील युवा शेतकऱ्याने उसाच्या पट्ट्यात पपई लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. ऊसपिक नफ्याहून अधिक नफा मिळविल्याने येथील पपई लागवडीचा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे.येथील युवा शेतकरी प्रकाश काशिनाथ टेंगले यांनी ऊसपिकास फाटा देत एक एकर क्षेत्रावर पपई पिकाची लागवड केली आहे. या पिकातून खर्च वजा जाता चार ते साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यांच्या या प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे. पाणीटंचाई निर्माण झाली असतानाही ठिबक सिंचन करून टेंगले यांनी मे महिन्यात एक एकर क्षेत्रात पपई लागवडीचे नियोजन केले. सुरुवातीला शेणखत टाकून शेत तयार केले. सात बाय आठ या अंतरावर पपईच्या झाडांची लागवड केली. पाण्याची भीषण टंचाई त्यामुळे ठिबक सिंचन केले. टेंगले ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तरीही ते शेतीवर लक्ष केंद्रित करतात. याकामी त्यांच्या कुटुंबाचे सामूहिक योगदान महत्त्वपूर्ण ठरले. एकत्रित कुटुंबामुळे शेतातील कामांचे परिपूर्ण नियोजन करणे शक्य झाले. पपईमध्ये त्यांनी आतंरपिक म्हणून सुरुवातीस झेंडूपिकाचे उत्पन्न घेतले. यावर लागवडीसह मशागतीचा खर्च निघाला. नियोजनामुळे रमजानच्या सणात पपईचे उत्पन्न सुरू झाले. बाजारभाव सरासरी दोनशे तीस रुपये मिळाला. आतापर्यंत दहा ते बारा टनापर्यंत माल निघाला आहे. >पपईला पंधरा ते वीस रुपये भाव मिळत आहे. जवळपास पाच ते साडेपाच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मशागत लागवडीचा खर्च झेंडूच्या आतंरपिकातून यापूर्वीच वसूल केला आहे. फळेतोडणी, प्रतवारी करणे, फळास कागदी पेपरात आवरण आदी कामासाठी कुटुंबातील सदस्यच मदत करतात. त्यामुळे खर्चात बचत होते. वडिलांसह कुटुंबाचा सामूहिक सहभाग, प्रोत्साहन यामुळे पपई लागवड प्रयोग फायद्याचा ठरला. त्यामुळे ऊसपिकास फाटा देऊन चांगले उत्पादन मिळाल्याचे आवर्जून टेंगले सांगतात.