लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळायला हवे. कोणीही वंचित राहता कामा नये, त्यामुळे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार गेल्या काही वर्षापासून मोहीम राबवत आहे. पण, आता ही मोहीम थंडावली असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. ही प्रक्रिया पुन्हा सुरू करावे, असे निवेदन कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे दिले आहे. या निवेदनानुसार, पटनोंदणी पंधरवडा १५ जून ते ३० जून या काळात असतो. या काळात जास्तीत जास्त शाळाबाह्य मुले शाळेत दाखल करणे शक्य आहे. यासाठी तालुकानिहाय याद्या करण्याची सूचना केली आहे, तर २०१५-१६ या वर्षात जी ४ सर्वेक्षण झाली त्या सर्वात जवळपास ७४ हजार विद्यार्थी सापडले. किमान त्या संख्येवर अधिकाऱ्यांचे एकमत आहे. ती संख्येची तालुकानिहाय विभागणी करावी व तशा याद्या कराव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यातील स्वयंसेवी संस्थांची लवकरात लवकर बैठक घ्यावी. या बैठकीत त्या-त्या संस्थांनी त्यांच्या परिसरात शोधलेल्या मुलांची यादी घ्यावी व ती नावे त्या-त्या जिल्हा तालुका यादीत समाविष्ट करावी, असे नमूद केले आहे. गेल्या वर्षी ही प्रक्रिया थंडाविल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त करत शिक्षणमंत्र्यांना नुकतेच एक निवेदन दिले आहे.
शाळाबाह्य मुलांसाठीचा उपक्रम थंडावला
By admin | Published: June 24, 2017 3:48 AM