मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात कम्युनिस्टांसोबत आता रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटासोबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, छात्र भारती अशा पुरोगामी पक्षांच्या संघटनांनीही उडी घेतली आहे. पुरोगामी व धर्मनिरपेक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केल्यास, ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिला आहे. परिणामी, डावे विरुद्ध अभाविप वादाचे रूपांतर आता अभाविप विरोधात पुरोगामी असे झाले आहे.खरात म्हणाले की, केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून अभाविप संघटनेच्या कुकर्मात भर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांहून संघटनेला इतर संघटनांना धमकी देणे, धार्मिक उन्माद पसरविणे, धर्माच्या नावावर इतरांना छळण्यात अधिक आनंद वाटत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारकडूनही या संघटनेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. इसिसप्रमाणेच धर्माच्या नावावर लोकांची डोकी फिरवण्याचे काम करणाऱ्या अभाविपने लोकशाही मार्ग सोडून ठोकशाही मार्ग वापरत पुरोगामी संघटनांवर हल्ले सुरू केले आहेत. याचा अर्थ लोकशाहीवर विश्वास असलेल्या पुरोगामी संघटना शांत राहतील, असा मुळीच नाही. यापुढे अभाविपने राज्यात कोणत्याही पुरोगामी कार्यकर्त्यावर हल्ला केल्यास, रिपाइं त्यास जशास तसे उत्तर देईल, असा इशारा खरात यांनी दिला आहे.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने गुरुवारी आझाद मैदानात निदर्शने करत अभाविपविरोधात घोषणाबाजी केली. देशभक्ती, देशद्रोह हा विनाकारण वाद उभा करून वाढती महागाई, बेरोजगारी, जातीयवाद या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अभिजित गजापूरकर यांनी केला आहे. ते म्हणाले की, दिल्ली विद्यापीठातील गुरमेहेर कौर या शहिदाच्या मुलीला पाठिंबा घोषित करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लवकरच मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये अभाविपविरोधात तीव्र आंदोलन करेल.छात्रभारतीने मरिन लाइन्स येथे मूक निदर्शने करत आपला रोष व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये अभाविपकडून गुंडशाहीची सुरुवात झाल्याचा आरोप भारतीचे राज्य उपाध्यक्ष सागर भालेराव यांनी केला आहे. भालेराव म्हणाले की, अभाविपविरोधात बोलणाऱ्या विद्यार्थिनीला काही समाजकंटकांनी थेट बलात्काराची धमकी दिली आहे. समाजकंटकांना सरकारने आवर घालावा, अशी मागणी आहे. गुरमेहेर कौरच्या बाजूने सर्व पुरोगामी शक्तींनी उभे राहावे, असे आवाहन भारतीने केले आहे. (प्रतिनिधी)>‘अभाविप’ची कोंडी करण्याचा प्रयत्न!लोकशाहीवादी देशात सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, मात्र ते लोकशाही पद्धतीने मांडावे, असे आवाहन करत रिपाइं, राष्ट्रवादी आणि छात्र भारती कम्युनिस्टांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. याआधी डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी दादर येथे अभाविपविरोधात तीव्र आंदोलन केले होते. परिणामी, इतर संघटनांकडूनही अभाविपची कोंडी करण्यासाठी या प्रकरणात उडी घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘अभाविप’विरोधात पुरोगामी एकवटले!
By admin | Published: March 03, 2017 2:14 AM