मुंबई : राजकीय सूडबुद्धीच्या भावनेतून भाजप सरकारांनी देशभरातील काँग्रेस नेत्यांविरूद्ध सुरू केलेल्या कारवाईचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी निषेधाचा ठराव मांडला, त्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुमोदन दिले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभे असल्याचे ठरावात म्हटले आहे.प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक बुधवारी टिळक भवन, दादर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष चव्हाण होते तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा सदस्य विजय दर्डा, हुसेन दलवाई, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख, मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, डॉ. पतंगराव कदम आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.पुढील वर्षभरात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही यावेळी चर्चा झाली. त्यानंतर माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करणारा ठराव मांडला. यावर मते मांडताना अनेकांनी भाजप सरकारवर टीका केली. हे सरकार केवळ मूठभर धनदांडग्यांसाठी काम करीत असून, परिस्थितीत सुधारणा न झाल्यास काँग्रेस पक्ष आक्र मकपणे रस्त्यावर उतरेल, असा इशारा खा. चव्हाण यांनी दिला. (प्रतिनिधी)
सरकारच्या सूडबुद्धी धोरणाचा निषेध
By admin | Published: February 18, 2016 7:02 AM