अहमदनगर : मोहटा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराच्या चौकशीला येथील धर्मादाय उपआयुक्तांनी स्थगिती दिली आहे. वरिष्ठ कार्यालयाशी झालेल्या चर्चेअंती चौकशी स्थगित करण्यात येत असल्याचे उपआयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.कोणाशी चर्चा झाली, तो तपशील आदेशात नमूद नाही. श्री जगदंबा देवी ट्रस्ट मोहटे येथील विश्वस्त मंडळाच्या कामकाजाबाबत माजी विश्वस्त नामदेव गरड यांनी धर्मादाय आयुक्त, विधी मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्यानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने चौकशीचा आदेश दिला आहे. त्याशिवाय ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘मोहट्याची माया’ या मालिकेनंतर देवस्थानने मंदिरात पुरलेल्या सोन्याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित होऊन मुख्यमंत्र्यांनीही चौकशीचे आश्वासन दिले आहे. त्यासंदर्भातील चौकशीही सुरू आहे.चौकशीचे अहवाल अद्याप समोर आलेले नाहीत. चार प्रकरणांच्या चौकशीकामी नगरच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील निरीक्षकांचे पथक १२ जुलैला देवस्थानच्या कार्यालयात जाणार होते. तशी नोटीसही दिली होती. मात्र त्याच दिवशी धर्मादाय उपआयुक्तांनी दौरा रद्द केला. उपआयुक्तांनी १६ सप्टेंबरला दुसरा आदेश काढला. त्यात जनहित याचिका प्रलंबित असल्याने पुढील चौकशीकामी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणे योग्य राहील, असे नमूद केले आहे. माहिती अधिकारात उपआयुक्तांचे हे आदेश उपलब्ध झाले आहेत.न्यायालयाचा स्थगिती आदेश नाहीमोहटा देवस्थानसंदर्भात २०१४ मध्ये ग्रामस्थांनी जनहित याचिका दाखल केलेली आहे. ही याचिका प्रलंबित आहे. देवस्थानची चौकशी करू नका, असा कुठल्याही न्यायालयाचा आदेश नाही, असे लेखी उत्तर नगरच्याच न्यास नोंदणी कार्यालयाने दिलेले आहे. चौकशीला स्थगिती देताना मात्र न्यायालयीन याचिकेचे कारण देण्यात आले आहे.
मोहटा देवस्थानच्या चौकशीला स्थगिती; वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा झाल्याचा हवाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 3:47 AM