नाशिक : दोन दिवसांपासून नाशिक येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेले किसान सभेचे महामुक्काम आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती डॉ. अशोक ढवळे, आ. जे. पी. गावित, किसन गुजर व डॉ. अजित नवले यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषदेत दिली.बुधवारी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी किसान सभेच्या नेत्यांची तासभर चर्चा झाली. त्यात महामुक्काम मोर्चात सहभागी झालेल्या राज्यभरातील एक लाख शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेण्यात येईल. त्यानंतर कर्ज माफ करण्यात येईल. वनजमिनी दाव्यांचा तीन महिन्यांत पुन्हा फेरआढावा घेण्यात येईल. शेतीमालाला ५० टक्के नफा धरून भाव देण्यासाठी व तसा आधारभूत भाव ठरविण्यासाठी पीकनिहाय प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. देवस्थान गायरान जमिनी, वरकस जमिनी कसणाऱ्यांचे जिल्हावार सर्वेक्षण करून जमिनी त्यांच्या नावे करण्यासाठी कार्यवाही करू, दुष्काळी भागात संपूर्ण वीजबिल मुक्त करण्यात येईल. तसेच बिगर दुष्काळी भागात ३० टक्के बिल माफ करण्यात येईल. दुष्काळी भागात रोहयोची कामे, वेळेवर वेतन, पाणी, चारा, रेशन, जनावरांना छावण्या आदी मागण्या पूर्ण करण्यात येतील. विधानसभा अधिवेशनानंतर या सर्व प्रश्नांवर पुन्हा एकदा किसान सभेच्या नेत्यांबरोबर चर्चा करण्यात येईल, अशी आश्वासने फडणवीस यांनी दिली. त्यांनी महामुक्काम सत्याग्रह मागे घेण्याची विनंती केल्याने हा सत्याग्रह तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय किसान सभेने घेतल्याचे नेत्यांनी सांगितले. माजी आ. नरसय्या आडाम, उद्धव पौळ, यशवंत झाडे, उमेश देशमुख, बारक्या मागांत यांच्यासह डॉ. ढवळे, गावित, गुजर, डॉ. नवले मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
महामुक्काम मोर्चा स्थगित
By admin | Published: March 31, 2016 12:52 AM