मुंबई : एमबीबीएसची तिसरी परीक्षा दिल्यावरही डॉक्टर ही पदवी मिळवण्यासाठी २०१८ पासून विद्यार्थ्यांना ‘नॅशनल एक्झिट टेस्ट’ (नेक्स्ट) द्यावी लागणार आहे. नेक्स्टला विरोध करण्यासाठी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बुधवारी रस्त्यावर उतरणार आहेत. सकाळी ११ ते १ या वेळेत वैद्यकीय विद्यार्थी आंदोलन करणार असून, निषेध व्यक्त करणार आहेत. एमबीबीएसचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना तीन प्रमुख परीक्षा द्याव्या लागतात. आताच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांनी तिसरी परीक्षा पास केल्यावर, त्यांना डॉक्टर ही पदवी बहाल करण्यात येते, पण यापुढे मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) नवीन नियामांनुसार, या विद्यार्थ्यांना तिसऱ्या परीक्षेनंतर नेक्स्ट ही परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यार्थी ही परीक्षा पास झाल्यावरच, त्यांना डॉक्टर ही पदवी देण्यात येणार आहे. हा निर्णय अयोग्य आहे. विद्यार्थ्यांनी किती परीक्षा द्यायच्या, असा सवाल विद्यार्थी संघटना करीत आहेत. त्यामुळे नेक्स्टला विरोध करण्यासाठी विद्यार्थी आता आंदोलन करणार असून, इंडियन मेडिकल असोसिएशनचा त्यांना पाठिंबा असल्याचे आयएमएचे पदाधिकारी डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ५० टक्के राखीव जागा आहेत. त्यापैकीही आता ५० टक्के जागा या तीन वर्षे शासकीय नोकरीत असणाऱ्या डॉक्टरांसाठी राखीव केल्या जाणार आहेत. या डॉक्टरांनी एमडी अथवा एमएस पूर्ण केल्यावरही त्यांना तीन वर्षे शासकीय सेवेत रूजू राहावे लागणार आहे. मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्थानिक पातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरणार नाहीत. त्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातच आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. उत्तुरे यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘नेक्स्ट’विरुद्ध वैद्यकीय महाविद्यालयांत निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2017 2:28 AM