लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर/सांगोला (जि. सोलापूर) : विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेले येथील प्रतिष्ठित महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप खडतरे यांनी रविवारी सकाळी पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीने प्राचार्य दिलीप खडतरे (५७) यांच्यावर छेडछाडीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्याची माहिती कळताच युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी खडतरे यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे खडतरे सांगोल्यातून पसार झाले होते. शनिवारपासून पोलीस खडतरे यांचा शोध घेत होते.रविवारी सकाळी नऊच्या सुमारास गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खडतरे यांनी उडी मारली. कर्मचाऱ्यांना आवाज येताच त्यांनी धाव घेत जखमी खडतरे यांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी खडतरे यांनी चिठ्ठी लिहिली असून आपल्याला गोवण्यासाठी षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे. छेडछाड केल्याचा आरोप करुन त्रास देणाऱ्या आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार खडतरे कुटुंबीय व सांगोल्यातील नागरिकांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात केली. खडतरे यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय त्यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यातच ठेवला आहे. खडतरे यांना आत्महत्येस भाग पाडल्याप्रकरणी युवा सेनेच्या नऊ कार्यकर्त्यांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विनयभंगाच्या गुन्ह्यातील प्राचार्याची आत्महत्या
By admin | Published: May 22, 2017 3:57 AM