ऑनलाइन लोकमत
लासलगाव, दि. 3 - निफाड तालुक्यातील रुई येथे आज राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढून दहन करन्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शेतकरी नेते यांच्यात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत शेतकरी संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले असले तरी हा निर्णय एकतर्फी घेतला गेला असून शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय न घेता विश्वासघात केला असल्याचा घणाघाती आरोप करत निफाड तालुक्यातील रुई येथील शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे.
शनिवारी सकाळी विविध वृत्तवाहिन्यांवर संप मागे घेण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाल्याचे पाहताच निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून याची पहिली प्रतिक्रिया ज्या गावात शेतकरी संघटनेचा जन्म झाला त्या रुई येथे उमटली आहे. येथील शेतकऱ्यांनी थेट सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे.
रुई या गावाला शेतकरी संघटनेचा मोठा इतिहास लाभला आहे. खरतर रुई येथेच शेतकरी संघटनेचा जन्म झाला असून त्याच रुई गावात शेतकरी संघटनेतून पुढे येवून कृषी राज्य मंत्रीपद मिळविलेल्या सदाभाऊ खोत यांच्या विषयी कमालीची नाराजी पाहायला मिळाली आहे. खोत यांनी शेतकरी संघटनेचा बिल्ला काढून थेट भाजपात प्रवेश करावा अशी संतप्त प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.