मुंबई : वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार? अशी विचारणा त्यांनी सत्ताधाऱ्यांना केली आहे.
ट्विटच्या माध्यमातून भाष्य करताना ते म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे, हे यातून स्पष्ट होते.
महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का? असा प्रश्न सध्या पडत आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असेही जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, वेदांता- फॉक्सकॉनपाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी त्याचे भूमिपूजन करणार आहेत.