लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शिवसेनेने विरोधी पक्षांच्या मदतीने रेड सिग्नल दाखवण्याआधी भाजपाने खेळी केली. मुंबई मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरेच्या हरित पट्ट्यातील ३३ हेक्टर जागा आरक्षित करण्यास भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे. मात्र, सुधार समितीत हा प्रस्ताव मंजुरीला आल्यानंतर त्यावर कोणी आक्षेप घेण्याआधी त्या जागेची पाहणी करण्याची सूचना भाजपाने मांडली. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळून लावण्याची शिवसेनेची संधी हुकली. नरिमन पॉइंट ते अंधेरी सिप्झपर्यंत धावणाऱ्या मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरे वसाहतीची जागा निश्चित करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात कारशेडसाठी जागेचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. आरेच्या एकूण जागेपैकी ३३ हेक्टर जागा मेट्रो कारशेड, वर्कशॉप, वाणिज्य सी १ वापरासाठी आरक्षित करा, असा प्रस्ताव नगर विकास विभागाने महापालिकेकडे पाठवला आहे. नगर विकास विभागाने केलेल्या सूचनेप्रमाणे महानगरपालिकेने आरेमधील आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीसमोर सादर करण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला विरोध करून शिवसेना आणि काँग्रेस हा प्रकल्प लटकवू शकते. याची जाणीव असल्याने भाजपाने सावध भूमिका घेतली. आरेला भेट देण्याची मागणी करीत भाजपाच्या उज्ज्वला मोडक यांनी हा प्रस्ताव पुढे ढकलण्याची सूचना केली. मुंबईमध्ये मोकळे भूखंड ६ ते ८ टक्के असायला हवे; परंतु आता फक्त दीड ते दोन टक्केच जागा मोकळी राहिली आहे. सर्वत्र काँक्रीटचे जंगल उभे राहिले आहे. आरेच्या हरित पट्ट्यामधील जागेवरील झाडे तोडल्यास तापमानात आणखी वाढ होईल, अशी भीती काँग्रेसचे अशरफ आझमी यांनी व्यक्त केली.पालिकेत शिवसेना आणि भाजपाचे संख्याबळ जवळपास समान आहे. विरोधकांच्या मदतीने शिवसेना हा प्रस्ताव दप्तरी दाखल करून भाजपाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लटकवू शकते. भाजपाने पाहणीच्या नावाखाली हा प्रस्ताव पुढे ढकलून वाचवला.
मेट्रो कारशेडचा प्रस्ताव लांबणीवर
By admin | Published: May 12, 2017 2:08 AM