मुंबई : एसटी महामंडळाने १00 हायटेक बसेस ‘लीज’वर (ठरावीक काळ किंवा मुदतीवर) घेण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र चार महिने उलटल्यानंतरही या प्रस्तावावर अंतिम निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला नाही. त्याउलट एसटीच्या संचालक मंडळाला प्रथम निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे या बसेस येण्यास आणखी काही कालावधी लागेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. एसटी महामंडळाकडे १८000 बसेस आहेत. यामध्ये ११0 एसी बसेस असून त्यापैकी ९0 बसेस भाड्याच्या आहेत. सध्या यातील काही एसी बसचीही दुरवस्था झाल्याने महामंडळाने ७0 एसी बसेस स्वत:च्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर एसटीच्या ताफ्यातील उर्वरित बसेस या निमआराम, साध्या, मिडी बसेस असून बहुसंख्य बसेसची अवस्था फारच बिकट झाली आहे. गर्दीच्या काळात तर मोडकळीस आलेल्या बसमधूनही प्रवाशांना प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात तर बसची अवस्था फारच बिकट असते. एकूणच बसची अवस्था बिकट असून नव्या बस घेण्यासंदर्भात एसटी महामंडळाकडून काहीच हालचाली केल्या जात नव्हत्या. अखेर उशिरा जाग आलेल्या एसटी महामंडळाने हायटेक अशा बस प्रवाशांच्या सेवेसाठी आणण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाने ‘लीज’वर बस घेण्यासाठीचा प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी तयार केला आणि तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला. मात्र वित्त विभागाने यात काही शंका उपस्थित करत एसटी महामंडळाला त्याचे निरसन करण्यास सांगितले. ते करतानाच एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने याबाबत बैठक घेऊन त्यानंतर शासनाला कळवावे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे बस घेण्याच्या प्रक्रियेत बराच विलंब होत असून जुलै महिना संपत आला तरी त्यावर निर्णय झालेला नाही. हा निर्णय होण्यास आणि बस ताफ्यात येण्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत.लीजवर घेण्यात येणाऱ्या बसमध्ये व्होल्वो, मर्सिडिज इत्यादी कंपन्यांच्या बसचा समावेश आहे.
‘लीज’ बसचा प्रस्ताव लांबणीवर
By admin | Published: July 31, 2015 2:33 AM