नाशिक : आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर आणि प्र-कुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले शीतयुद्ध, दोहोंचा कार्यकाळ संपण्याच्या अखेरच्या टप्प्यातही कायम आहे. त्यामुळे नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया किमान दोन ते तीन महिने लांबण्याची दाट शक्यता आहे.डॉ. राजदेरकर यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपद जाऊ नये, याची पूरेपूर काळजी घेत, कुलगुरूंनी प्रभारी कुलगुरूंसाठी दोन संभाव्य नावे राजभवनात पाठविली असल्याचे वृत्त आहे. जामकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २० डिसेंबरला पूर्ण होत आहे, तर नियमानुसार त्याच दिवशी प्र-कुलगुरू डॉ. राजदेरकर यांचाही कार्यकाळ संपुष्टात येईल.जामकर यांनी मुंबईच्या डेंटल महाविद्यालयाच्या डॉ. सुहासिनी नगाडे आणि केईएमचे डॉ. अविनाश सुपे यापैकी एकास प्रभारी कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात यावे, असा अभिप्राय राजभवनात पाठविला आहे. विशेष म्हणजे, उपरोक्त व्यक्ती विद्यापीठाच्या कोणत्याही समितीवर कार्यरत नसल्याने, त्यांना विद्यापीठीय कामाचा कोणताही अनुभव नसल्याचे समजते. नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया लांबल्यामुळे २१ डिसेंबरपूर्वी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती अपेक्षित आहे. राज्यपालांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
कुलगुरूंची निवड लांबणीवर
By admin | Published: December 15, 2015 2:41 AM