मुंबई : राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विकास आराखड्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मान्यता दिली. या परिसरातील १९ शिवकालीन तलावांचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत दिले.सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या टप्पा १ आणि २बाबत मंत्रालय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार प्रताप जाधव, आमदार शशिकांत खेडेकर आदी उपस्थित होते. विकास आराखड्याच्या टप्पा १साठी २५ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देतानाच यातून लखुजी राजे भोसले यांचा राजवाडा, निळकंठेश्वर मंदिर, काळाकोट या स्थळांचा विकास करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिंदखेडराजा परिसरात शिवकालीन १९ तलाव आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये या तलावांसाठी जलसंधारणाचा प्रस्ताव तयार करून पाठवावा, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तलावांचे सुशोभीकरण करण्यात यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सिंदखेडराजा विकास आराखडा तयार करताना स्वच्छतेवर भर देऊन पाणीपुरवठा, मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन यांचा समावेश करावा. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि त्यांची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विकास आराखड्यामध्ये स्वच्छतागृहांच्या उभारणीवर भर द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.टप्पा १मधील विकासकामे पूर्ण केल्यानंतरच टप्पा २मधील कामांना मान्यता दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आडगाव राजा ते सिंदखेड राजा यादरम्यान ८ किलोमीटर लांबीचे भुयार आहे. त्याचे संवर्धन केल्यास मोठ्या प्रमाणावर पर्यटक आकर्षित होतील, असे सांगून सिंदखेड राजा परिसराचा विकास दोन वर्षांत पूर्ण करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी विकास झाडे यांनी सादरीकरण केले. (प्रतिनिधी)
शिवकालीन तलावांचे संवर्धन करा
By admin | Published: October 04, 2016 5:00 AM