ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - महापालिका निवडणुकीत काँग्रेसतर्फे नारायण राणे यांनी प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला असून लवकरच राणेंचीही प्रचारतोफ धडाडणार आहे. संजय निरुपम यांच्या कारभारावर नाराज असल्याने नारायण राणे यांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालत समजूत घातल्यानंतर अखेर नारायण राणे यांनी नाराजी दूर सारत प्रचारमैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
नारायण राणे यांच्यासोबतच गुरुदास कामत यांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. अगोदरच निवडणुकीत पिछेहाट झाली असताना पक्षातील दोन ज्येष्ठ नेते नाराज असणं पक्षाला परवडणारं नसल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी लक्ष घालत दोघांची समजूत घातली. तोंडावर आलेल्या निवडणुका पाहता सोनिया गांधींनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळालं, आणि दोन्ही नेत्यांनी प्रचार करण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे लवकरच मुंबईत नारायण राणेंची प्रचारतोफ धडाडणार आहे.
'मुंबईच्या प्रचारासाठी संजय निरुपम सक्षम आहेत. मला 25 जिल्ह्यात जायचं आहे. त्यामुळे मी मुंबईच्या प्रचारात सहभागी होणार नाही', असं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलं होतं. 'सेना- भाजपला शह देण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीसाठी आग्रही होतो. पण संजय निरुपम यांना आघाडीची गरज वाटत नाही', असं राणे म्हणाले होते.