ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - बढतीतील आरक्षण विधेयक संसदेत लवकरात लवकर मांडण्यात यावे अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केली. केंद्र सरकारच्या वतीने दलित विकासासाठी केल्या जाणा-या उपाय योजनांसंदर्भातही आठवले यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली.
अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दहावीपश्चात शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. मात्र, या योजनेसाठी निधी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून शिष्यवृत्ती वितरण करण्यात येऊ शकली नाही. ही बाब आठवले यांनी मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली आणि यासाठी निधी वाढवण्याची मागणीही केली.