ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' या पुस्तकातून 'पुत्रप्राप्ती'साठी उपाय सुचवत, त्याचा प्रचार व प्रसार करत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याप्रकरणी डॉ. बालाजी तांबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीने डॉ. तांबे तसेच पुस्तकाचे प्रकाशक व विक्रेते यांच्याविरोधात संगमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त 'लोकसत्ता'ने दिले आहे.
याप्रकरणी डॉ. तांबे यांना गेल्या वर्षी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तांबे यांच्याकडून कोणताही खुलासा न आल्याने त्यांच्यावर संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना तीन वर्षांपर्यंतची तुरूंगावासाची शिक्षा होऊ शकते. दरम्यान याप्रकरणी डॉ. तांबे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीय
गेल्या काही वर्षात देशभरात स्त्रीभ्रूण हत्येची अनेक धक्कादायक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारने २००३ साली पुरुषप्रधान प्रवृत्तीला पायबंद घालणारा, लिंगनिवडीला प्रतिबंध करणारा आणि पर्यायाने मुलींचा जन्म सुरक्षित करण्यासाठी 'पीसीपीएनडीटी' कायदा केला. त्या कायद्यानुसार, गर्भलिंग निदान करणा-या वा प्रसवपूर्व लिंग निवड करण्याचा प्रचार-प्रसार
करणा-यांविरोधात पोलीस ठाण्यात न जाता थेट न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्याचाच आधार घेऊन सामाजिक कार्यकर्ते गणेश बो-हाडे यांनी डॉ. बालाजी तांबे यांच्या 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकातील पुत्रप्राप्तीबद्दल सुचवलेले उपाय व त्यामुळे कायद्याचा झालेला भंग यासंदर्भात अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालय शल्यचिकित्सकांना नोटीस दिली. व संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी ४ डिसेंबर २०१५ रोजी घेतलेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत तांबे व इतरांनी कायद्याचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असा ठराव करण्यात आला. या ठरावानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी तांबेंविरोधातील आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर न्यायालयात गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजीव घोडके यांना दिले.
मात्र तांबे यांना १९ डिसेंबर २०१५ मध्ये कारणे दाखवा नोटीस बजावूनही कोणताच खुलासा आला नाही. अखेर गेल्या आठवड्यात तांबे यांच्यासह संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूर?
आयुर्वेदशास्त्राने प्रसवाच्या दुसऱ्या अवस्थेत म्हणजे गर्भाचा प्रत्यक्ष प्रसव होताना, सोबत असणाऱ्या व प्रसवास मदत करणाऱ्या स्त्रीने, प्रसव होणाऱ्या स्त्रीच्या कानात विशेष मंत्र म्हणायला सांगितले आहे. स्त्री प्रवाहण करत असताना हा मंत्र ऐकायचा आहे. -पान-१०८. एखाद्या कुटुंबात मुलगी असताना नंतर मुलगा व्हावा अशी इच्छा असल्यास काही वावगे ठरू नये. त्यादृष्टीने आयुर्वेदात मुलगा होण्यासाठी विशेष उपाय सुचविलेले असतात. गर्भधारणा झाल्यानंतर पुसंवन विधी सुचविलेला असतो. पुसवंन विधीचे निरनिराळे योग सांगितलेले सापडतात. उदाहरणार्थ-वडाच्या झाडाच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला गेलेल्या फांद्यांचे केवळ कोंब दुधात वाटून तयार झालेल्या मिश्रणाचे पुष्य नक्षत्रावर मुलगी हवी असल्यास डाव्या नाकपुडीत, तर मुलगा हवा असल्यास उजव्या नाकपुडीत नस्य करावे.
काय सांगतो कायदा?
पीसीपीएनडीटी कायदा कलम २२-गर्भलिंग निदान निवडीबाबत जाहिरातीस बंदी आहे. छापील पत्रक, संवाद अगर एसएमस, फोन, इंटरनेटद्वारे गर्भलिंग निदान आणि निवडीची जहिरात करण्यास बंदी. कलम-२२(३), कलम २२ चा भंग झाल्यास संबंधितास तीन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षेची तरतूद.