अकोला : महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत राज्यात मनुष्यबळ विकासावर भर देण्यात येत असून, फळ काढणी पश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धीत शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमांतर्गत पश्चिम विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेवून, विविध प्रक्रिया उद्योगही सुरू केले आहेत.मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत कृषी व फळकाढणी पश्चात प्रशिक्षणाचे ४७ भाग तयार केले आहेत. कौशल्य वृद्धीच्या या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य घेतले जात आहे. तीन ते सात दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी २० प्रशिक्षणार्थींच्या एका बॅचकरीता या प्रकल्पातंर्गत ५० हजार रू पयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्यात दहा हजार ग्रामीण महिला, युवक व शेतकरी गटांच्या सदस्यांमधून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात पाचशेच्यावर शेतकऱ्यांना असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत सोयाबीनपासून विविध प्रक्रिया उत्पादनांची निर्मीती आणि विक्री, मक्यावर आधारित लघू उद्योग, लिंबूवर्गीय फळ पिकांची काढणी व पश्चात व्यवस्थापन, कापूस पिकाची वेचणी व काढणीनंतरच्या विविध कामांचे व्यवस्थापन, लिंबूवर्गीय फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग, डाळ गिरणी व डाळीच्या पिठाची गीरणी,भात प्रक्रिया उद्योग, परदेशी भाजीपाला उत्पादन आणि विक्री, व्यावसायिकदृष्ट्या दुर्लक्षित फळांचे प्रक्रियेच्या माध्यमातून मूल्यवर्धन, चटणी, लोणची गृह उद्योग, फळे भाजीपाला सुकवून हवाबंद डब्यात साठविणे तसेच गोठविण्याचा व्यवसाय, पारंपारिक मसाला पिकांची काढणी, हाताळणी साठवण व विक्री व्यवस्था, आंबा प्रकिया उद्योग, ऊसापासून रस, गुळ आणि काकवीचे उत्पादन व विक्री, केळी प्रक्रिया उद्योग, हरितगृह तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, दुध प्रक्रिया उद्योग, टोमॅटो, बटाटा व मिरची प्रक्रिया उद्योग, पुष्परचना आणि पुष्प सजावट व्यवसाय, काजू प्रक्रिया उद्योग, शेतमालाची सुरक्षित वाहतूक व्यवस्था आदीचे प्रशिक्षण शेतकरी, बचत गटांना देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
मूल्यवर्धित शेतीसाठी प्रोत्साहन
By admin | Published: September 23, 2014 4:49 AM