प्रचाराचे फंडे: इलेक्शन...मेंबर लागले कामाला...!सोलापूर : आॅनलाईन लोकमत ऐन टप्प्यात महापालिकेची निवडणूक आलीय... साऱ्यांनीच ‘यंदा मेंबर आम्हीच’ या थाटात सारेच कामाला लागले आहेत. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल सहापट उमेदवार बाशिंग बांधून तय्यार झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या जोडीला पारंपरिक लोककलेतील ओव्या, भारुड, उखाण्यांचीही चलती सुरु आहे तर पथनाट्यातून ‘चला परिवर्तन घडवू या’ चा नारा दिला जाऊ लागला आहे.स्मार्ट सिटीकडे वाटचाल करु पाहणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत १०२ जागांसाठी तब्बल ६२३ जणांनी भावी नगरसेवक बनण्यासाठी कंबर कसली आहे. प्रमुख समजल्या जाणाऱ्या काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी चौरंगी लढत होतेय़ त्यात अन्य पक्ष आणि नाराज मंडळींनी सवतासुभा करुन अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. प्रत्येकाने प्रचारामध्ये अनोखे फंडे वापरण्यास प्रारंभ केला आहे. गाजलेल्या चित्रपटांच्या गाण्यांच्या चालींवर मतदारांना साद घातली जाऊ लागली आहे. तरुणाईची आवड लक्षात घेऊन उडत्या चालीच्या गीतांचीही चलती सुरु आहे. यामुळे आॅडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या स्टुडिओवाल्यांचीही चांदी झाली आहे.शहरात जिकडे पाहावे तिकडे वाहनांवर ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचाराने माहोल तापला आहे. कुणी लोककलेतल्या वासुदेवाला मतदानाचे आवाहन करण्यासाठी प्रचारात उतरवले आहे तर कुणी गोंधळी, आराधी मंडळींचा वापर उमेदवारांनी प्रचारात केला आहे. अनेक ठिकाणी महिलांनी पदयात्रा, हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करुन मतदानाचे आवाहन करणे सुरु केले आहे. येथे उखाण्यांचीही रेलचेल सुरु आहे. ‘राव आले उन्हातून त्यांना देते सरबत, अमक्याला मत देते मला नाही करमत’ अशी मजेशीर उखाणेही शहरात ध्वनिक्षेपकावर विविध ठिकाणी ऐकायला मिळू लागले आहेत. उखाण्यांमध्ये चिन्हांचा खुबीने वापर होऊ लागला आहे. अंतिम टप्प्यात प्रचार आल्याने सर्वांची एकच धांदल सुरु आहे. प्रत्येक जण आपला मुद्दा कसा बरोबर आहे, आम्हाला साथ द्या, असे आवाहन करीत शहराला स्मार्ट करण्याचे आश्वासन देऊ लागला आहे. विविध पक्षांच्या स्टार प्रचारकांसह कार्यकर्ते समर्थक निकराच्या लढाईसाठी कामाला लागले आहेत. ----------------------वृक्षमित्राकडून प्रबोधनाचा जागरया निवडणुकीत लोकशाहीचा धागा अधिक बळकट व्हावा या जाणिवेतून आप्पासाहेब म्हमाणे या वृक्षमित्राने प्रबोधनाचा जागर चालवला आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते टाकाऊ वस्तूंना वापरात आणून त्याद्वारे वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या दुमजली घरावर त्यांनी वृक्ष जोपासण्याच्या चळवळीला वाहून घेतले आहे. या निवडणुकीत त्यांनी आपल्या टेरेसवर सर्व पक्षांचे चिन्ह असलेले बकेट आकर्षकपणे रंगवून त्यात रोपटे लावले आहे आणि त्यातून निर्भयतेने मतदान करण्याचे आवाहन करताना ‘ परीक्षेत एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला अन् लोकशाहीमध्ये एका मताला किंमत असते. प्रत्येकाने एक मत द्या, एक झाड लावा’ असा संदेश दिला आहे. मोठा डिजिटल फलक लावून त्यांनी लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ------------------------------माकपचे ‘चला परिवर्तन घडवू या...’यंदा अल्पकाळात प्रचार यंत्रणा राबविण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिल्यामुळे मापकने प्रजा नाट्य मंडळाच्या माध्यमातून ‘चला परिवर्तन घडवू या’ या पथनाट्यातून शहरातील सर्व समस्या यात प्रामुख्याने वीज, पाणी, रस्ते, आरोग्य यांना स्पर्श करीत सक्षम पर्याय असलेल्या उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन केले आहे. गेल्या सहा दशकांपासून मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांचा लोकांच्या प्रबोधनाचा उपक्रम सुरु आहे.
प्रचाराचे फंडे: इलेक्शन...मेंबर लागले कामाला...!
By admin | Published: February 16, 2017 7:19 PM