मुंबई : मनसेच्या इशार्यानंतर बेस्ट प्रशासनाने २४ तासांच्या आतच बसगाड्यांवरील वादग्रस्त गुजराती जाहिरात काढण्यास सुरुवात केली. मात्र, या प्रकरणात अडचणीत आलेल्या शिवसेनेने मौन बाळगून आपला बचाव केला आहे.
बेस्टच्या २00 बसगाड्यांवर संदेश या गुजराती वृत्तपत्राच्या जाहिरातींमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. या जाहिरातीतून संदेशने मुंबईच्या वारशावरच घाला घातला असल्याचा आक्षेप मनसेने घेतला होता. मात्र, गुजराती भाषिकांवरील वादग्रस्त अग्रलेखाचा वाद ताजा असल्याने यावर शिवसेनेने मौन बाळगले आहे. बेस्ट प्रशासनाने मनसेच्या इशार्यानंतर आज सकाळीच कारवाईला सुरुवात केली. दुपारपर्यंत १0 टक्के बसगाड्यांवरील गुजराती जाहिरात काढून टाकण्यात आली. २00 बसगाड्यांवर या जाहिराती असल्याने त्यावर कारवाई करण्यास दोन दिवसांचा कालावधी लागेल. सोमवारपर्यंत सर्व जाहिराती काढण्यात येतील, असे बेस्टचे प्रवक्ता ए. तांबोली यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
गुजराती वृत्तपत्राच्या आक्षेपार्ह जाहिरातीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलून धरीत शिवसेनेची कोंडी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण शेकण्यापूर्वी शिवसेनेनेही बाजू सावरुन धरण्याचा प्रयत्न आता सुरु केला आहे. मात्र भाजपाने यावर भाष्य करण्यास नकार देऊन एकप्रकारे गुजराती वृत्तपत्राच्या मजकुराचे सर्मथन केले आहे.
काँग्रेसने विचारला जाब
मुंबईच्या विकासात सर्व धर्मीयांचे योगदान आहे. त्याचे श्रेय कोणता पक्ष अथवा समाज घेऊ शकत नाही. खरेतर शिवसेनेने यापूर्वी ही कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु मित्रपक्षापुढे मूग गिळून बसलेल्या शिवसेनेचे मराठीवरील बेगडी प्रेम यातून दिसून आले.
- देवेंद्र आंबेरकर, विरोधी पक्षनेते
भाजपाचा भाष्य करण्यास नकार
त्या जाहिरातीबद्दल मला वृत्तपत्रातून कळले. पण, या विषयावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. याबाबत वरिष्ठच भाष्य करतील.
- मनोज कोटक, भाजपाचे गटनेते