अमरावती : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी सायंकाळी थंडावल्या. तत्पूर्वी ६२८ विविध पक्षीय उमेदवारांसाठी आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस ‘सुपर संडे’ ठरला. प्रत्येक उमेदवारांकडून आणि पक्षाकडून अधिकाधिक ‘हॅमर’ करण्यात आले.
प्रचाररथ, भोंगे यासह पदयात्रेवर रविवारी उमेदवारांचा सर्वाधिक भर राहिला. भाजप, काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांचे उमेदवार पॅनलच्या स्वरुपात जनतेसमोर गेलेत. एकंदरीतच रविवारी संपूर्ण शहरावर ‘इलेक्शन फिवर’ जाणवला. २१ फेब्रुवारीला अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. काँग्रेससमोर सत्ता टिकविण्याचे तर भाजपला ती मिळविण्याचे आव्हान आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. या निवडणुकीत तब्बल ६२८ उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक प्रभागात बहुरंगी लढत अपेक्षित आहेत. एखाद-दुसरा ठिकाणीच ‘वन टू वन’ लढत होणार आहे. मुळ पक्षाला रामराम ठोकत वेळेवर पक्षबदल करून तिकीट मिळविणाऱ्यांसाठीही विजय तितकाच महत्त्वाचा आहे. २२ प्रभागातील ८६ जागांसाठी २१ फेब्रुवारीला ७३५ मतदान केंद्रावरून ५ लाख ७२ हजाराहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. (प्रतिनिधी)