धर्मराज हल्लाळे -भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी । उदगीर (जि. लातूर) : आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्य निर्मितीवर काही घटक भर देत आहेत. चित्रपट क्षेत्रात उघड उघड झालेला शिरकाव आपणास दिसतो आहेच. हेच साहित्यात झाले तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा देत उद्घाटक शरद पवार यांनी साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये असा सल्ला शुक्रवारी येथे दिला.
उदयगिरी महाविद्यालयाच्या स्वरसम्राज्ञी लता मंगशेकर नगरीत भरलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर संमेलन अध्यक्ष भारत सासणे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,श्रीपाल सबनीस,माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,उद्योग मंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सध्याचा काळ मोठा कठीण : भारत सासणेसमाजात विभाजनवादी निरर्थक,पण अनर्थकारी, उत्तेजना वाढवणारा खेळ मांडला जातोय. सगळीकडे दडे बसवणारी शांतता आहे. सर्वत्र ‘चतुर मौन’आहे. यात स्वार्थ आहे, तुच्छता आहे, भीती व दहशत आहे, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी अध्यक्षीय भाषणातून कोरडे ओढले. काळ तर मोठा कठीण आला आहे असा निर्देश करून ते म्हणाले की, आता आपण ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे.
आगामी संमेलन गोव्यात भरवावे : दामोदर मावजो -दामोदर मावजो यांनी भाषणात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठीचा बळी देऊन गोव्यात कोकणीला राजभाषेचा दर्जा दिल्याचा आरोप केला. संमेलन गोव्यात भरवा. मराठीबरोबरच कोकणी भाषिकही ते यशस्वी करतील, असे ते म्हणाले.