गौरीशंकर घाळे -मुंबई : महाराष्ट्रातील नोंदणी रद्द झालेल्या विश्वस्त संस्थांची स्थावर आणि जंगम मालमत्ता सरकारजमा होणार आहे. नोंदणी रद्द झालेल्या संस्थांच्या मालमत्तांची पडताळणी करण्याचे निर्देश राज्याचे धर्मादाय आयुक्तांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ट्रस्ट, संस्थांची नोंदणी होत असते. यातील अनेक संस्था नियमानुसार ऑडिट रिपोर्ट आणि चेंज रिपोर्ट सादर करत नाहीत. तर, अनेक संस्था या वर्षानुवर्षे निष्क्रिय असतात, त्यांच्या मार्फत कोणतेच कामकाज होत नाही. मात्र, त्या नोंदणीकृत असल्याने धर्मादाय आयुक्तालयावर निष्क्रिय संस्थांचा बोजा मात्र वाढत असतो. या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबर २०१७ रोजी तत्कालीन धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशानंतर राज्यभरात अशा संस्थांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. तेव्हाच्या एकूण ८ लाख १७ हजार ४१६ नोंदणीकृत संस्थांपैकी आतापर्यंत १ लाख ३९ हजार ५१६ संस्थांची नोंदणी रद्द केली गेली.नोंदणी रद्द झालेल्या संस्थांची स्थावर आणि जंगम मालमत्ता संबंधीत धर्मादाय उपआयुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी मालमत्तेची योग्य प्रकारे विक्री करून ती रक्कम सार्वजनिक न्यास प्रशासन निधीमध्ये जमा करण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, अद्याप तशी कार्यवाही झाली नाही. या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी नोंदणी रद्द झालेल्या ट्रस्टच्या मालमत्तांची पडताळणी करून योग्य कार्यवाही करण्याचे तसेच त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- नोंदणी रद्द झाल्यानंतर अनेक ठिकाणी संबंधीत ट्रस्टची मालमत्ता सरकारजमा न होता ती बळकावली जाते. विश्वस्त संस्थांची मालमत्ता खासगी बनवून त्याचा वापर केला जातो. - या प्रकाराला आळा घालण्यासाठी मालमत्तांची पडताळणी आणि ती सरकारजमा करण्याची मोहीम धर्मादाय आयुक्तालयाकडून घेतली जाणार आहे.