नागपूर : गृहनिर्माण प्रकल्पात सवलती देत स्वस्तात घर, फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणा-या बिल्डर्सला आता चाप बसणार आहे. त्यासाठी विधी व न्याय विभागाचे मत घेऊन एमपीआयडी कायद्यात (महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इन्व्हेस्टर अॅण्ड डिपॉझिटर्स अॅक्ट) दुरुस्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरची इतर मालमत्ता जप्त करून तिची विक्री केली जाईल व त्यातील रकमेतून संबंधितांचे पैसे परत करणे त्यामुळे शक्य होईल. याशिवाय बँकेचे अधिकारी बिल्डर्सशी संगनमत करून अपुरी कागदपत्रे असतानाही कर्ज मंजूर करीत असल्याचे आढळल्यास त्यांनाही अशा प्रकरणात सहआरोपी केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ठाणे, नवी मुंबई यासह मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट बुक करून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. हे सर्व प्रकार ले-आऊट व बांधकाम क्षेत्रातील काही सराईत लोक करीत आहेत का, याची चौकशी करण्यासाठी व असे गुन्हे घडल्यास गुन्हेगारांना त्वरित शोधून काढण्यासाठी एक टास्क फोर्स नेमला जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या संबंधीचा प्रश्न विचारला होता. (प्रतिनिधी)
फसवणाऱ्या बिल्डर्सची मालमत्ता जप्त होणार
By admin | Published: December 24, 2014 2:58 AM