राजू ओढे, ठाणेसैन्य भरती घोटाळ्याच्या तपासातून पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे लागले आहेत. आरोपींनी पेपरफुटीच्या पैशातून उत्तर प्रदेश, हरियाणात विकत घेतलेली मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या असून, त्यासाठी तीन पथके या राज्यांमध्ये रवाना होणार आहेत.सैन्यातील ४ पदांसाठी २६ फेब्रुवारी रोजी देशभरात पार पडलेल्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या २४ आरोपींना ठाणे पोलिसांनी पुणे, नागपूर आणि गोव्यातून अटक केली होती. आरोपींमध्ये सैन्याच्या काही आजी-माजी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्या मागदर्शनाखाली गुन्हे शाखेचे साहाय्यक आयुक्त मुकुंद हातोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या प्रकरणातील बहुतांश आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असले तरी, तपासादरम्यान पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे लागले आहेत. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपिकवर्गीय कर्मचारी रवींद्रकुमार जांगू, धरमवीरसिंग आणि निगमकुमार पांडे हे या टोळीतील प्रमुख आरोपी आहेत. पोलिसांनी आरोपींचे मोबाइल फोन जप्त केले होते. यातून ते कोणाच्या संपर्कात होते, प्रश्नपत्रिका कुणा-कुणाला पाठविण्यात आली होती इत्यादी तपशील पोलिसांना मिळाला आहे. याशिवाय धाडीच्या वेळी ताब्यात घेतलेल्या ३५0 विद्यार्थ्यांचे जबाबही पोलिसांनी नोंदविले आहेत. प्रश्नपत्रिका फोडण्याचा सौदा १ कोटी ३५ लाखांत ठरला होता. त्यापैकी ५0 लाख रुपये आरोपींना मिळाले होते. प्रश्नपत्रिका फोडण्याची आरोपींची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही आरोपींनी हे उद्योग करून मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवली.
सैन्य भरती घोटाळ्याच्या पैशातून उत्तर प्रदेशात मालमत्ता
By admin | Published: March 15, 2017 4:10 AM