अमरावती : गुंतवणूकदारांना विविध योजनांचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीची सिंधुदुर्ग व धुळे जिल्ह्यातील १५ कोटींची मालमत्ता उघड झाली. अमरावतीतील आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण ६५ कोटींची मालमत्ता उघड केली असून, त्यावर प्रशासक नियुक्तीसाठी राज्य शासनाला पत्र पाठविले आहे. ‘मैत्रेय’विरोधात आतापर्यंत २० हजार जणांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. कंपनीच्या सर्वेसर्वा वर्षा सत्पाळकर यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, तर आर्थिक गुन्हे शाखेने परभणीच्या जनार्दन पराळेकर यांना अटक केली होती. पोलिसांनी यापूर्वीच मैत्रेयची ४५ कोटींची मालमत्ता उघड केली होती. आता कंपनीची सिंधुदुर्ग व धुळे जिल्ह्यातील मालमत्ता अमरावती पोलिसांनी उघड केली आहे.अमरावती पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील रुनमळी तालुक्यातील साखरी गावातील ९० हेक्टर जमीन व २२४ एकर शेतजमीन अशी एकूण १० कोटींची मालमत्ता, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोधियाळे पिंगुळी येथील १३ व गोंधळपूर तालुक्यातील कराड येथील एक मालमत्ता अशी एकूण ५ कोटींची मालमत्ता उघड केली आहे. या मालमत्तेवर प्रशासक नियुक्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला पत्र पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
‘मैत्रेय’ची १५ कोटींची मालमत्ता उघड
By admin | Published: January 26, 2017 4:57 AM