मुंबई : राज्यात एड्स नियंत्रणासाठी काम करणाऱ्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांना केंद्र सरकारच्या एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन (नॅको) कडून २०१५-१६ चे अनुदान मिळालेले नाही. थकीत अनुदान देण्याबाबतच प्रस्ताव नॅकोकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत दिली. याबाबत संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी एड्स नियंत्रणासाठी संस्थांना निधी मिळत असूनही एड्सग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे सांगितले, तर दिलीप वळसे पाटील यांनी या क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांची निवड करण्याची पद्धत काय, अशी विचारणा केली. यावर राज्यमंत्री शिंदे यांनी एड्सग्रस्तांची संख्या वाढली असली, तरी लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ कमी झाली आहे. नॅको, नवी दिल्ली यांच्या वार्षिक कृती आराखड्याप्रमाणे कार्यरत असलेल्या १८३ अशासकीय संस्थांना सन २०१५-१६ मध्ये ३०.५९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी एप्रिल ते सप्टेंबर २०१५ पर्यंत १५.०४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित १५.५४ कोटी देणे बाकी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एड्स नियंत्रण निधीचा प्रस्ताव नॅकोकडे
By admin | Published: March 17, 2016 12:45 AM