पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला लेखी परीक्षेतील एकूण गुणांपैकी २० टक्के गुण मिळवावे लागतील, असे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले असले तरी शासनाने अद्याप त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. उपरोक्त निर्णयाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून होणार का?, याबाबत विद्यार्थ्यांसह मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम आहे. राज्य मंडळातर्फे ८०/२० ‘पॅटर्न’नुसार दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या लेखी परीक्षेत आणि २० गुणांच्या तोंडी परीक्षेत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे उत्तीर्ण केले जाते. मात्र, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेसाठी सढळपणे २० पैकी २० गुण दिले जातात. त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मंडळाकडून ग्रेस गुणांची सवलत दिली जाते. परिणामी लेखी परीक्षेतील ८० गुणांपैकी ५ किंवा १० गुण मिळविणारे विद्यार्थीही दहावी- बारावीच्या परीक्षेत सहज उत्तीर्ण होतात. मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत केवळ ग्रेस गुणांचा आधार घेवून पावणे तीन लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. लेखी परीक्षेत ५ ते १० गुण मिळविणारे विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्याचे राज्य मंडळाच्याही लक्षात आले होते. शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने ही बाब योग्य नसल्यानेच राज्य मंडळाने लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळविण्याचे बंधन घातले. विज्ञान शाखेच्या काही विषयांच्या परीक्षा ७०/३० गुणांच्या आधारे घेतल्या जातात. या विषयांनाही हाच निकष लागू राहील,असे मंडळाने जाहीर केले होते. मात्र, सत्ताबदल झाल्यामुळे राज्य मंडळाने नव्या सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीसाठी सादर केला. परंतु, लालफितीच्या कारभारामुळे हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. (प्रतिनिधी)
लेखी परीक्षेतील २० टक्के गुणांचा प्रस्ताव लालफितीत
By admin | Published: December 01, 2015 3:25 AM