सातारा : ‘महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजसुधारणेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने देशात समतेचे राज्य निर्माण झाले. या दोघाही थोर विभूतींना भारतरत्न मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला असून, त्याचा पाठपुरावा राज्य सरकार करत आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नायगाव (ता. खंडाळा) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंती सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘फुले दाम्पत्याने देशात सुरू केलेले समतेचे वातावरण टिकवून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कुठल्याही परिस्थितीत पुरोगामित्व मागे पडू देणार नाही. आज जे समतेचे राज्य निर्माण झाले आहे आणि माता भगिनींना समान वागणूक मिळत आहे, ती फुले दाम्पत्याची देण आहे. त्यांना काही आम्ही देऊ ही आमची पात्रता नाही, त्यांनीच आपल्या सर्वांवर मोठे उपकार केले आहेत. आपल्या सर्वांच्या दृष्टीने फुले दाम्पत्य भारतरत्नच आहेत. त्यांना भारत सरकारचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे.’ दरम्यान, महात्मा फुलेंनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती.
या वाड्याची दुरुस्ती करून त्यात त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा उद्देश सरकारने ठेवला आहे. मात्र, हा वाडा कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने कायदेशीर बाबी पूर्ण करून निश्चितपणे राष्ट्रीय स्मारकउभारण्याचा मनोदयही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.या कार्यक्रमास मुख्यमंत्री तब्बल तीन तास उशिरा आले. तत्पूर्वी समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ हे या कार्यक्रमात भाषण करुन निघून गेले होते. भूजबळ म्हणाले, ‘फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार जगभरात पोहोचविण्यासाठी नायगाव येथे अभ्यासकेंद्र उभे राहिले पाहिजे. शेती आणि उद्योगाचे ज्ञान शिक्षणातून दिले पाहिजे, हा विचार महात्मा फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी मांडला. सध्याच्या काळात सत्यधर्माने वागणे गरजेचे आहे. महिलांना मंदिरात प्रवेश नाही तर मग त्यांचा धर्म कोणता? असा प्रश्न पडतो. महिलांच्या शिक्षणासाठी ज्यांनी बिजं रोवली, त्या सावित्रीबाई यांनाच शिक्षणाची खरी देवता मानले पाहिजे.’
कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जलसंपदा मंत्री प्रा. राम शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, आ. शशिकांत शिंदे, आ. शंभूराज देसाई, आ. मनीषा चौधरी, कमलताई ढोले-पाटील, महापौर राहुल जाधव, बापूसाहेब भुजबळ, विभागीय पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, तसेच जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा बिघडलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या हेलिकॉप्टरने नायगावला येणार होते. त्यामध्ये गुरुवारी पुन्हा तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच बिघाड उघड झाल्याने पुढील अनुचित घटना टळली; पुण्याहून दुसरे हेलिकॉप्टर आल्यानंतर ते या नायगाव येथील या कार्यक्रमाला दुपारी १ वाजता तब्बल तीन तास उशिरा पोहोचले.मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत अनुचित प्रकार होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. दोन वर्षांतील ही सातवी घटना आहे. याची चर्चाही घटनास्थळी होती....अन् मुख्यमंत्र्यांनी हात जोडलेपुण्यातून मुंबईत हेलिकॉप्टर मागवले होते. ते येण्यास उशीर झाला, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमावेळी केले, याचाच धागा पकडत सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने चांगल्या प्रकारचे पाच ते सहा हेलिकॉप्टर घेण्याची सूचना केली. हे ऐकल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क हात जोडत नितीन भरगुडे-पाटील यांच्या मागणीला हसून दाद दिली.भुजबळांसोबत एकाच व्यासपीठावर येण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळलेनायगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. गेली अनेक वर्षे माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ हे कार्यक्रम नेटाने करत आले आहेत. यावेळी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला आले. मात्र, छगन भुजबळ नायगावमध्ये असेपर्यंत मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईतून उडालेच नाही. त्याला तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. हा खरंच तांत्रिक बिघाड होता की राजकीय बिघाड, याबाबत कार्यक्रमस्थळी उलटसुलट चर्चा सुरू होती.