मुंबई - Sanjay Nirupam on Sharad Pawar ( Marathi News ) येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील तर काही विलिनीकरणाचा विचार करू शकतात असं विधान शरद पवारांनी एका मुलाखतीत केले. पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा सुरू झाली. त्यातच आता नुकतेच काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या संजय निरुपमांनी एक ट्विट करत शरद पवारांबाबत मोठा दावा केला आहे.
संजय निरुपम यांनी म्हटलं की, शरद पवार बरेच दिवसांपासून त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनकरण करण्याचा विचार करत आहेत. काँग्रेसनेही पवारांना अनेकदा प्रस्ताव दिला आहे. मात्र पवारांच्या लेकीमुळे पेच आहे. शरद पवारांना लेक सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसनं नेतृत्व सोपवावं असा आग्रह धरला होता. ज्याला काँग्रेसने नाकारले. आता परिस्थिती बदलली आहे. पवारांचा पक्ष विखुरला आहे असं निरुपमांनी सांगितले.
तसेच शरद पवारांच्या नुकत्याच केलेल्या विधानाचा अर्थ त्यांच्या हातून बारामती निसटण्याचा अंदाज त्यांना आला आहे. जर असं झालं नाही तरी काँग्रेसमध्ये विलीनकरण करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय बाकी नाही. कारण त्यांच्या लेकीकडे जी काही राजकीय समज आहे ते पाहता ती बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी सक्षम नाही. परंतु जे विलीनकरण होईल ते नुकसानात चाललेल्या २ कंपन्यांचे होईल. त्याचा निकाल शून्य असेल असा टोलाही संजय निरुपम यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
पुढील २ वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा त्यातील काहींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी चांगला असेल असंही वाटू शकते. तसेच काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. आमच्या दोघांचीही विचारधारा गांधी-नेहरू यावर वाटचाल करत आहे असं पवारांनी म्हटलं. इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत पवारांनी हे विधान केले. त्यामुळे भविष्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेला बळ मिळालं आहे.तसेच माझ्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु पुढील काळातील निर्णय आणि रणनीती ही सामुहिकपणे विचार करून घेतले जातील. आम्हाला नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणे ते पचवणे कठीण आहे असंही शरद पवारांनी पुढे सांगितले.