मुंबई : मराठा समाजाच्या मोर्चाद्वारे करण्यात येणाऱ्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि मोर्चेकऱ्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव, राज्य शासनाकडून मोर्चाच्या शिष्टमंडळास दिला जाणार आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले. मात्र, मोर्चाच्या आधी सरकार आणि मोर्चेकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होण्याची शक्यता नाही. शासन आणि मोर्चेकरी संघटनांमध्ये अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी काही नेत्यांशी व्यक्तिश: चर्चा केली आहे.मराठा समाजाचे काही आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले. त्या वेळी फक्त मोर्चाच्या तयारीसंदर्भात चर्चा झाली. मोर्चेकरांचे शिष्टमंडळच अधिकृत भूमिका मांडेल, असे त्यांनी सांगितले.मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सुरुवातीपासूनच अतिशय सकारात्मक आहे. ९ तारखेचा मोर्चा सुरळीत व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना देऊन, सहकार्य करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. मराठा समाजाचे बरेच प्रश्न आम्ही सोडविले आहेत आणि उर्वरित प्रश्न सोडविण्याची आमची प्रामाणिक भूमिका आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीमोर्चेकऱ्यांना टोल माफ : मोर्चासाठी राज्यभरातून येणाऱ्या वाहनांकडून येताना आणि जातानाही टोल वसूल करू नये, अशा सूचना शासनाकडून टोल नाक्यांवर देण्यात आल्या आहेत.
मराठा मोर्चेकऱ्यांसमोर संयुक्त समितीचा प्रस्ताव!
By यदू जोशी | Published: August 08, 2017 4:14 AM