मुंबई : गेल्या वर्षभरात रखडलेले १८८ कोटींचे विकासकामांचे प्रस्ताव दोन आठवड्यांपूर्वी स्थायी समितीमध्ये घाईघाईने मंजूर केल्यानंतरही आयत्या वेळीचे प्रस्ताव आणण्याचा सपाटा शिवसेना-भाजपा युतीने लावला आहे़ आर्थिक वर्ष संपत आल्याने विकासकामांच्या प्रस्तावांची ठेकेदारांना खैरात वाटण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे़ रस्ते आणि चर बुजविण्याचा तब्बल ६०० कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आज आणण्यात आला होता़ मात्र सत्ताधाऱ्यांचा हा डाव विरोधी पक्षांनी उधळून लावला़सन २०१५-१६ या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पुढच्या आठवड्यात सादर होणार आहे़ गेल्या वर्षभरातील तरतूद विकासकामांवर खर्च करण्यासाठी पालिकेकडे ३१ मार्चपर्यंतची मुदत आहे़ याच संधीचे सोने करीत ठेकेदारही आपले उखळ पांढरे करून घेत आहेत़ यासाठी सदस्यांना तीन दिवस आधी प्रस्ताव पाठविण्याच्या नियमाचेही उल्लंघन सुरू आहे़ यावर दोन बैठकांपूर्वीच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता़ मात्र त्या वेळेस सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केले होते़स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत चर बुजविण्याचे साडेतीनशे कोटींचे कंत्राट व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे अडीचशे कोटींचे कंत्राट स्थायी समितीच्या पटलावर आज घाईघाईने आणण्यात आले़ कूपर रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयासाठी फर्निचर बसविण्याचा ५० कोटींचा प्रस्तावही होता़ यापैकी कूपर रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला़ मात्र रस्ते व चर बुजविण्याच्या प्रस्तावाला सर्वच विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला़ त्यामुळे हा प्रस्ताव अखेर लांबणीवर टाकणे सत्ताधाऱ्यांना भाग पडले़ (प्रतिनिधी)
रातोरात ६५० कोटींचे प्रस्ताव
By admin | Published: January 29, 2015 5:53 AM