- अतुल कुलकर्णीमुंबई : युतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेसह सहभागी व्हावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे भाजपाकडून गेला होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना तो मान्य झाला नाही, त्यांना शिवसेना सत्तेत नको होती पण आम्हाला शिवसेनेला स्वत:हून बाहेर काढायचे नव्हते, अशी खळबळजनक माहिती भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.राष्टÑवादीचे नेते माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिल्याचे सांगत भाजपाने पवार यांच्या ‘त्या’ मुलाखतीचे जोरदार भांडवल करणे सुरू केलेले असताना राष्टÑवादी काँग्रेसची इकडे आड-तिकडे विहीर अशी अवस्था झालेली असतानाच ही माहिती समोर आली आहे.ज्यावेळी शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याच्या गोष्टी करत होती. त्यावेळी राष्टÑवादीने सत्तेत सहभागी व्हावे, असा प्रस्ताव दिल्लीतून आला होता. त्यानुसार अनेक गोष्टी जवळपास अंतिम टप्प्यातही आल्या होत्या, मात्र शिवसेना बाहेर पडण्याविषयी काहीच बोलत नव्हती. दिल्लीच्या बड्या नेत्यांनी देखील शिवसेनेला स्वत:हून बाहेर काढायचे नाही, असे ठरवले होते. शेवटी पाच ते सहा मंत्रीपदे राष्टÑवादीला देऊन त्यांनी शिवसेनेसारखेच सत्तेत यावे, असा प्रस्तावही राष्ट्रवादीकडे पाठवला गेला पण तो पवारांनी मान्य केला नाही, असेही तो नेता म्हणाला. राष्टÑवादीच्या भूमिकेविषयी आधीच संभ्रम असताना त्यांच्या मोदी विषयींच्या विधानांचा फायदा घेत राष्टÑवादीला कोंडीत पकडण्याची व एकटे पाडण्याची खेळी खेळली जात असल्याचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.दुसरीकडे पवारांच्या कथित मुलाखतीमुळे झालेले डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना पवारांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, असे खुलासे करण्याची वेळ आली आहे. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल घोटाळ््याचा विषय अत्यंत व्यवस्थित लावून धरलेला आहे. समोर आलेली कागदपत्रे पाहता व हा अत्यंत मोठा घोटाळा असताना पवार यांनी स्वत:च्या खासदार कन्या सुप्रिया सुळे आणि पुतणे अजित पवार यांच्या सोयीसाठी ही भूमिका घेतली का?, असा आमच्या मनात संशय असल्याचे काँग्रेसच्या एका अत्यंत ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवले.राष्टÑवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थताआम्ही आमच्याकडील कागदपत्रे योग्य वेळी समोर ठेवू, त्यानंतरही पवारांचे मोदींविषयी हेच मत राहील का? असेही तो नेता म्हणाला. पवारांच्या या विधानानंतर राष्टÑवादीच्या नेत्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. काहीही करून या ‘डॅमेज’मधून कसे बाहेर पडायचे, यावर नेत्यांमध्ये खल चालू आहे.
राष्ट्रवादीला सेनेसह सहभागी होण्याचा दिला होता प्रस्ताव!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 7:23 AM