लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २०१४ मध्ये २५ वर्षीय तरुणाच्या वडाळा कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी आठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांवर हत्येप्रकरणी खटला चालवा, असे निर्देश उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला गुरुवारी दिले.न्या. बी.पी. धर्माधिकारी व न्या. एस.एस. जाधव यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाला आरोपी पोलीस अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या), २०१ (पुरावे नष्ट करणे) व २९५ (ए) (जाणूनबुजून एखाद्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणे) इत्यादी अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले.‘सकृतदर्शनी हे प्रकरण कोठडी मृत्यूचे आहे,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यातील आठ पोलिसांवर भारतीय दंडसंहिता कलम ३३८ (एखाद्याला गंभीर दुखापत करणे किंवा एखाद्याचा जीव धोक्यात घालणे) व कलम ३७७ (अनैसर्गिक संबंध) अंतर्गत गुन्हा नोंदविला होता.मात्र, याविरोधात पीडित अँजेलो वाल्द्रीस या तरुणाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपींवर आयपीसी ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. एप्रिल २०१४ मध्ये किरकोळ गुन्ह्यासाठी वडाळा पोलिसांनी अटक केलेल्या वाल्द्रीस याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला होता. सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी वाल्द्रीस याचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून संधी मिळताच तो पोलिसांच्या हातून निसटला आणि लोकलच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. तर वाल्द्रीसच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी वाल्द्रीस व त्याच्या तीन मित्रांना अटक केली. पोलीस कोठडीत असताना या सर्वांचा पोलिसांनी सतत मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच त्यांना अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.या आठही आरोपींना सेवेतून निलंबित करण्यात आले व अटकही करण्यात आली. मात्र, सध्या या सर्व आरोपींची जामिनावर सुटका केली.‘खाकी वर्दीकडूनच अत्याचार झाल्यास पीडित असहाय्य’वाल्द्रीसला पोलिसांनी इतकी मारहाण केली होती को तो धड चालूही शकत नव्हता. मग तो पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला, असे म्हणणे अयोग्य आहे, असे साक्षीदार असलेल्या मित्रांनी तपासयंत्रणेला सांगितले. तसेच डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालातही असेच नमूद केले आहे. न्यायालयाने या सर्व बाबी विचारात घेऊन वाल्द्रीस पोलिसांच्या ताब्यातून निसटून जाणे अशक्य असल्याचे मान्य केले. त्याशिवाय देशात कोठडी मृत्यू प्रकरणांत वाढ होत असल्याची खंतही न्यायालयाने निकालात व्यक्त केली आहे. ‘देशात कोठडी मृत्यू प्रकरणांची वाढ होत आहे. कोठडीत भावनिक शारीरिक किंवा मानसिक स्वरुपाचा छळ करण्यात आला तर त्याचा पीडित व्यक्तीवर कायमचा परिणाम होतो,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.‘या प्रकरणी पीडिताचा छळ कायद्याचे संरक्षण करणाºयांनीच केला आहे. सुरुवातीपासूनच पोलिसांवर संशय होता. खाकी वर्दीआड आणि पोलीस ठाण्याच्या चार भिंतीत छळ करण्यात आला तर पीडित व्यक्ती असहाय्य असतो,’ असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. पोलिसांनी पीडित व्यक्तीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याच्या धर्मावरून ते अपमानास्पद बोलले, असेही न्यायालयाने म्हटले.
‘त्या’ हत्येप्रकरणी आठ पोलिसांवर खटला चालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 6:04 AM