मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरी या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप होताच त्यांचे राजीनामे घेतले गेले. त्याच न्यायाने अमित शहा यांनीही अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मुलावर झालेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊ द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांच्या टेंपल कंपनीच्या उलाढालीत अचानक १६००० पटीने वाढ झाली आहे. ही कंपनी नोटाबंदीच्या काही दिवस आधी बंद करण्यात आली होती.हे प्रकरण ‘वायर’ या न्यूज पोर्टलने उघडकीस आणले आहे. त्यामुळे या प्रकरणाची आयकर विभाग, ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. याच ‘वायर’ने आधी रॉबर्ट वड्रा यांच्याविषयीची बातमी समोर आणली होती. त्याची याच सरकारने सीबीआयमार्फत चौकशी लावली आहे. तोच पारदर्शीपणा याही प्रकरणात दाखवावा, असेही चव्हाणम्हणाले.जय शहा यांच्या कंपनीने केलेल्या व्यवहारांचा खुलासा त्यांनी स्वत: केला पाहिजे. पण एका खाजगी व्यक्तीच्या कारभाराचा खुलासा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल कसे काय करू शकतात? त्यांनी तो खुलासा कोणत्या अधिकारात केला, असा सवालही चव्हाण यांनी केला. जय शहा यांच्या कंपनीला विंड मील व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपनीने त्यांना कोणत्या अधिकारात १० कोटींचे कर्ज दिले? दुसºया एका खाजगी कंपनीची उलाढाल आठ कोटींच्या आसपास असताना त्या कंपनीने १५ कोटींचे कर्ज कोणत्या नियमानुसार दिले, असे अनेक प्रश्न चौकशीशिवाय सुटणार नाहीत, असेही चव्हाण यांनी या वेळी सांगितले.
जो न्याय गडकरींना तो शहांनाही लागू, अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी : पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:47 AM