मुंबई : राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच क्लीन चिट दिली असली तरी विरोधकांनी केलेल्या आरोपांचे एकाही मंत्र्याला खंडन करता आले नाही. त्यामुळे जोपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अथवा उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांमार्फत मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे सांगत विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून काही प्रकरणात न्यायालयाने ताशेरे ओढलेले असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात काढून टाकावे, अशी मागणी विरोधकांनी केली. या चर्चेला उत्तर देताना सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना आरोप करताना भान ठेवण्याचा सल्ला दिला. वारंवार चुकीचे आरोप केले तर एखादा व्यक्ती आयुष्यातून उठू शकतो. पुराव्यांशिवाय वारंवार होणा-या आरोपांमुळे परिवाराला, मित्रपरिवारालाही नाहक त्रास सोसावा लागतो. त्यामुळे मंत्र्यांवर आरोप करताना कुठे थांबायचे त्याचेही भान विरोधकांनी ठेवावे, असे आवाहन पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)‘...तर तुमच्या शेतात राबू’ कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्यावरील आरोप खोडताना माझे या बँकेत खातेदार नाही आणि थकबाकीदारही नाही, असे स्पष्ट केले. माझ्यावरील आरोप हे घरगुती वादातून झाले आहेत. मी कोणाचीही संपत्ती हडप केलेली नाही. माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी तुमच्या शेतात गडी म्हणून राबायला तयार आहे. नाहीतर तुम्हीही तशीच तयारी ठेवा, असे थेट मराठवाडा स्टाईल आव्हान दिले. ‘तर जगातून निघून जावू’एका नव्या पैशाचाही आपण भ्रष्टाचार केला नाही. काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी मोठ्या थाटात फायलींचा ढीग आणला होता. पण, तासभर बोलून एकही ठोस मुद्दा मांडता आला नाही. फायलींच्या या डोंगरातून उंदीरही निघाला नाही. माझ्याविरोधातील आरोपात तथ्य आढळल्यास राजकारणातूनच नव्हे जगातून निघून जावू, असे गिरीष बापट म्हणाले.
भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीवरून गदारोळ
By admin | Published: July 26, 2016 2:29 AM