मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व समीर कुलकर्णी यांच्या दोषमुक्ततेच्या याचिका उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी सोमवारी दाखल करून घेतल्या.मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यानेही दोषमुक्ततेसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने यापूर्वी ही याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. साध्वी व समीरची याचिका दाखल करून घेत न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी या तिन्ही याचिकांवरील सुनावणी १३ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जखमी झाले. ज्या मोटारसायकलमध्ये स्फोटके होती, ती साध्वीच्या मालकीची होती. स्फोटाच्या काही दिवसांपूर्वी तिने ती विकली होती. भोपाळ प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या समीर कुलकर्णी याला नोव्हेंबर २००८ मध्ये एटीएसने अटक केली. तो बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.दरम्यान, २७ डिसेंबर २०१७ रोजी विशेष एनआयए न्यायालयाने बॉम्बस्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर यांची मकोकातून सुटका केली. मात्र बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) कायद्यातील काही कलम व भारतीय दंड संहितेतील काही कलमांतर्गत सर्वांवर खटला चालणार आहे.
प्रज्ञासिंह ठाकूरसह समीर कुलकर्णीची याचिका दाखल, मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 1:57 AM