ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 19 - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे, असे भासवण्याचा प्रयत्न केला जात असतानाच बुधवारी शहापूर तालुक्यातील शिरोळ गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या महामार्गाच्या प्रकल्पाला पाठिंबा जाहीर केला. या गावातील 38 शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी लागणार असून, सर्वांनी जमिनी देण्याचे कबूल केले आहे.या प्रकल्पामुळे आपल्या गावातील पाण्याच्या खदानीवर टाच येईल, अशी शिरोळ गावातील ग्रामस्थांना भीती होती. मात्र, पाण्याच्या खदानीवर टाच येणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिली. तसेच, पाण्याबाबत काही समस्या आल्यास ती कायमस्वरुपी सोडवण्याची खात्रीही त्यांना दिली. त्यावर या गावातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाबाबत आपली काहीही हरकत नसून प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे श्री. शिंदे यांना सांगितले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी रेवती गायकर याही उपस्थित होत्या.या प्रकल्पाबाबत शंका असलेल्या शेतकऱ्यांना शिंदे स्वतः भेटून त्यांच्या मनातील शंकाकुशंका दूर करत आहेत. त्यामुळे शेतकरी या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देण्यास राजी होत असून गेल्याच आठवड्यात नागपूर येथे शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर १२० शेतकऱ्यांनी जमिनी देण्याबाबत पत्र दिले होते.
शिरोळ गावातील शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 8:26 PM