पुणे : गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटक असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड या कंपनीने कर्मचा-यांचा १२ लाख ३४ हजार ४२ रुपयांचा निधी लाटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी मोतेवारच्या पत्नीसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.वैशाली महेश मोतेवार आणि राजेंद्र पांडुरंग भंडारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भविष्य निर्वाह निधी निरीक्षक सुरेश फाळके (वय ५५, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारे याला ओडिशा पोलिसांनी अटक केली असून वैशाली मोतेवार फरार झाल्या आहेत. समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेडचे शिवाजीनगर येथील लॅण्डमार्क बिल्डींगमध्ये कार्यालय आहे. या कंपनीमध्ये आॅगस्ट २०१४ ते मार्च २०१६ पर्यंत काम केलेल्या साधारणपणे २२५ कर्मचा-यांचा भविष्य निर्वाह निधी कंपनीने भरलाच नाही. दरम्यान, अनेक कर्मचारी नोकरी सोडून गेले, तर काही नव्याने रुजु झाले. या कामगारांच्या पगारामधून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कापण्यात आली होती. मात्र, ही रक्कम प्रत्यक्षात कामगारांच्या खात्यामध्ये भरण्यात आलीच नाही. या रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करुन आरोपींनी त्याचा अपहार केला. एप्रिलमध्ये भविष्य निर्वाह निधीच्या अधिका-यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी कंपनीसोबत पत्रव्यवहार करुन कामगारांचा निधी जमा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रत्येक पत्र व्यवहारानंतर कंपनीने मुदत मागून घेतली. त्यांना मुदत देऊनही निधी जमा करण्यात आलाच नाही. (प्रतिनिधी)
‘समृद्ध जीवन’ने लाटला भविष्य निर्वाह निधी
By admin | Published: May 12, 2016 3:40 AM