मुंबई : नवी मुंबईतील दलित समाजातील १६ वर्षीय विद्यार्थ्याची त्याच्या उच्चवर्णीय प्रेयसीच्या नातेवाईकांनी हत्या केल्याप्रकरणी १३ जणांवर दोषारोपपत्र दाखल केले असून त्याच्या मुलाच्या कुुटुंबियांना संरक्षण दिल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. राज्य सरकारच्या या माहितीनंतर उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.मुलाची हत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना संरक्षण मिळावे. तसेच अनुसूचित जाती व जमाती कायद्याअंतर्गत (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत पीडित मुलाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले अद्वैत सेठना यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. सुनावणीत सरकारी वकीलांनी मुलाच्या हत्येप्रकरणी १३ जणांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. तसेच याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार मुलाच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षणही देण्यात आले आहे, अशी माहिती खंडपीठाला दिली. या माहितीनंतर उच्च न्यायालयाने ही याचिका प्रलंबित ठेवून उपयोग नाही, असे न्यायालय म्हणाले. (प्रतिनिधी)
पीडित मुलाच्या कुटुंबीयांना संरक्षण
By admin | Published: March 04, 2017 1:43 AM