मुंबई : पर्यावरणाची परिस्थिती व निसर्ग साखळी चांगली राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक प्राण्याचे जतन होणे गरजेचे आहे. अॅनिमल हॉस्पिटल तथा केअर सेंटरच्या निर्मितीकामी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. राज्य शासनाच्या वन विभागाने जंगल आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. पूर्वी लोक वन्य प्राण्यांना शत्रू समजत असत, पण वन विभागाने याबाबत केलेल्या जनजागृतीमुळे आता जंगल आणि प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी लोक स्वत:हून पुढे येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.टाटा ट्रस्ट आणि पीपल फॉर अॅनिमल यांच्यामार्फत मुंबई येथे प्रस्तावित असलेल्या अॅनिमल हॉस्पिटल आणि केअर सेंटरचे भूमिपूजन शुक्रवारी हॉटेल ताज पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री मेनका गांधी म्हणाल्या, ‘निसर्गातील प्रत्येक प्राणी महत्त्वाचा आहे. निसर्गातील प्राण्याची एखादी प्रजाती नष्ट झाली, तर त्याचा पर्यावरणावर मोठा दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक प्राण्याचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पर्यावरण संवर्धनासाठी प्राण्यांचे संरक्षण होणे गरजेचे - मुख्यमंत्री
By admin | Published: March 26, 2017 3:20 AM