ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - वस्तू व सेवा कायद्यांतर्गत (जीएसटी) अन्नधान्य, आटा, रवा, मैदा, बेसन या जीवनावश्यक वस्तूंना शून्य टक्के कर लावण्यात येणार आहे. मात्र, याच वस्तू ट्रेडमार्कमध्ये आल्या तर त्यास ५ टक्के कर लागणार आहे. या कररचनेला व्यापा-यांचा विरोध असून काही संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी येत्या शुक्रवारी पुण्यात व्यापा-यांची राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली आहे.
येत्या दि. १ जुलैपासून देशात जीएसटी करप्रमाणी लागू होणार आहे. त्यात मिरची, धने, हळद, चिंच, बेदाणा व अन्य कृषी उत्पादनांवर पाच टक्के कर लावण्यात येणार आहे. तर खुल्या बाजारातील अन्नधान्य, आटा, रवा, मैदा व बेसनाला यातून वगळण्यात आले आहे. पण या वस्तू ब्रँडेड व ट्रेडमार्क असलेल्या पॅकिंगमध्ये असतील तर अशा वस्तुूना पाच टक्के कर लावला जाणार आहे. यावर चर्चा करण्यासाठी दि पूना मर्चंट्स चेंबरच्यावतीने येत्या शुक्रवारी पुण्यात व्यापा-यांची राज्यव्यापी परिषद होणार आहे. या परिषदेत कररचनेवर विचारविनिमय होणार असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी दिली.
ट्रेडमार्कवरील वस्तुंवर पाच टक्के करावर व्यापाºयांमध्ये नाराजी आहे. सर्वप्रकारच्या जीवनावश्यक वस्तु करमुक्त करणे आवश्यक आहे. त्यातून ट्रेडमार्क वस्तुही वगळाव्यात, अशी व्यापाºयांची मागणी आहे. काही व्यापारी संघटनांनी हा कर रद्द न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत राज्यातील सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी एकत्रित येवून चर्चा करणार आहे.