पुणे : गेले अनेक उपोषण करूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याने पुण्यातील आंदोलनकर्त्यांनी चक्क सरकारी कार्यालयात गाढव सोडून निषेध केला आहे. या अनोख्या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाल्याचे बघायला मिळाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ संलग्न तोलणार संघटना व भारतीय कामगार सेनेच्यावतीने पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरु होते. १०० टक्के तोलाई वसूल झाली पाहिजे, अनोंदीत आडत्यांची माथाडी मंडळात नोंदणी व्हायला हवी, तोलणार कामगारांच्या अनुकंपा तत्वावर भरती प्रक्रिया राबवावी या आणि इतर मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले. मात्र या विषयावर प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर आज कार्यालयात गाढवे सोडण्यात आली.या बाबत कामगार नेते बाबा आढाव म्हणाले की, तोलणारांची वसुली व नोंदणी अनेक दिवसांपासून प्रलंबित असून ती होत नाही तोवर आंदोलनाची व्याप्ती वाढत जाईल.