मनोहर कुंभेजकर / मुंबईगोरेगाव येथे झालेल्या जनता दल युनायटेडच्या प्रदेश मेळाव्यात भाषण करताना बिहारचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी महाराष्ट्रात वरचढ असलेला मराठा समाज आरक्षण मागत आहे, ही शोकांतिका असल्याची टीका केली. सकल मराठा समाजाने नितीश कुमार यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. नितीश कुमार यांचे हे वक्तव्य आणि त्याचबरोबर शेतकरी आत्महत्यांमागील सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीबद्दलचे त्यांचे अज्ञान यामुळे समोर आल्याचे मराठा समाजाने म्हटले आहे. या वक्तव्याचा सकल मराठा समाजाचे मुंबई अध्यक्ष अनिल शिंदे आणि सचिव संदीप जाधव यांनी निषेध केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी तपासली तर त्यात सर्वांत जास्त आत्महत्या या मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. या परिस्थितीसाठी सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. स्वातंत्र्यानंतर सर्वच सरकारांनी राबवलेली चुकीची धोरणे, शेतीकडे केलेले दुर्लक्ष, बळीराजा उपेक्षित ठेवण्याची सरकारची नीती, शेती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा न देणे, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी अर्थव्यवस्था यासारखी अनेक कारणे असल्याचे सकल मराठा समाजाने म्हटले आहे. नितीश कुमार यांनी सवंग प्रसिद्धीसाठी टीका न करता, या गंभीर विषयाकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहावे. त्याचबरोबर मराठा समाजाचा आरक्षण हा विषय आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरू नये, या विषयाच्या सामाजिक पार्श्वभूमीकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे शेतकरी आत्महत्या या विषयावरही राजकारण न करता त्याकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहावे, असे सकल मराठा समाजाने म्हटले आहे.
नितीश कुमारांच्या वक्तव्याचा सकल मराठा समाजातर्फे निषेध
By admin | Published: April 28, 2017 2:39 AM